त्यागमय जीवनाचा अर्थ
लेवीय हे असे पुस्तक आहे जिथे पवित्र शास्त्र वाचण्याच्या अनेक योजना मृत होतात. उत्पत्ती आणि निर्गम ह्या पुस्तकांमध्ये जे लोक चांगली सुरुवात करतात ते इस्राएल लोकांप्रमाणे, लेवीय आणि गणना ह्यामधील वाळवंटात अडखळतात आणि दाविदाच्या कथेकडे किंवा पौलाच्या पत्रांकडे जाण्यास आतुर होतात. अनेकांना यज्ञपद्धतींचे अबकड शिकवले गेले नसल्यामुळे ते अडखळतात. प्राण्यांच्या अवयवांची व्यवस्था करणे, रक्त शिंपडणे आणि शारीरिक उत्सर्जन याविषयीच्या सूचना लेव्यांच्या जगाचे मूलभूत व्याकरण शिकल्याशिवाय समजण्यासारख्या नाहीत.
तथापि, एकदा आपण काही मूलभूत गोष्टी समजून घेतल्यानंतर, आपल्याला असे आढळते की आपण केवळ लेवीय हे पुस्तक अधिक समजूतदारपणे वाचण्यास सक्षम होत नाही; तर पौलाच्या पत्रांसह उर्वरित पवित्र शास्त्रातील पूर्वी दडलेली सखोलता देखील आपण पाहू शकतो. खालील वाक्यांचा विचार करा, फिलिप्पैकरांना ते जे काही करतात ते न डगमगता किंवा तक्रार न करता करा असा उपदेश केला आहे :
तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो; आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा. (फिलिप्पै. 2:17–18)
येथील भाषा लैवीय आहे आणि विविध स्तर असलेली आहे. लेवीच्या चष्म्यातून ख्रिस्ती जीवनाचा आणि इतरांच्या सेवेचा विचार करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलेले आहे. पौल असे गृहीत धरतो की त्याचे वाचक विविध यज्ञ आणि अर्पणांशी परिचित असतील आणि त्याद्वारे त्याच्या सेवेचे ध्येय आणि त्यांच्या जीवनाचे ध्येय समजून घेण्यास सक्षम असतील.
माझे सर्वस्व तुझ्या सर्वस्वासाठी
पौलाने दोन अर्पणांचा उल्लेख केला आहे – पेयार्पण आणि यज्ञार्पण (शब्दश:, “आपल्या विश्वासाचा त्याग आणि सेवा”). दुसर्या यज्ञाला बहुधा वर जाणार्या अर्पणाचा संदर्भ आहे, ज्याला कधीकधी “होमार्पण” असे म्हणतात.
“प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती आता एक जिवंत वर जाणारे अर्पण आहे आणि ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे ती दररोज स्वतःला देवाला सादर करते.”
होमार्पण हे जुन्या करारातील मूलभूत अर्पण आहे, ज्यामध्ये उपासक निष्कलंक प्राण्यावर हात ठेवतो जेणेकरून निष्कलंक प्राणी आता पापी उपासकाचे प्रतिनिधित्व करतो. प्राण्याला मारले जाते, त्याचे रक्त काढून टाकले जाते आणि नंतर याजकाद्वारे वेदीवर शिंपडले जाते. यानंतर याजक वेदीवर शरीराच्या कापलेल्या अवयवांची मांडणी करतो, डोके आणि चरबीच्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करतो. शेवटी याजक संपूर्ण प्राण्याला जाळून टाकतो जेणेकरून उपासकाचा प्रतिनिधी म्हणून तो प्राणी प्रसन्न सुगंध म्हणून धुरात देवाकडे चढतो.
हे अर्पण संपूर्ण समर्पणाचे, आपल्या पापिष्टपणा व्यतिरिक्त जिवंत आणि पवित्र देवाच्या जवळ जाण्याच्या आपल्या अंतःकरणाच्या इच्छेचे योग्य प्रतिबिंब आहे. त्यात उपासक थोडक्यात असे कबूल करतो, “हे देवा, माझे सर्वस्व मी तुझ्या सर्वस्वाकरिता देतो.” पौलाने यज्ञव्यवस्थेचा हा घटक रोम. 12:1–2 मध्ये मांडलेला आहे :
म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.
नवीन करारात, अग्नी आणि धुराद्वारे प्राणी अर्पण करण्याऐवजी, आपण स्वत:ला – आपले शरीर आणि आपले मन – आपली आध्यात्मिक सेवा आणि देवाची उपासना म्हणून अर्पण करतो. आपण आपल्या शरीराचे अवयव देवाला त्याची साधने म्हणून सादर करतो आणि त्याच्या वचनाच्या सत्याला आपले मन आणि अंतःकरण अर्पण करतो. पौलाने फिलिप्पैकरांस पत्रामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, आपण हे सर्व विश्वासाने करतो. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती आता एक जिवंत वर जाणारे अर्पण करतो आणि ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे दररोज देवासमोर स्वतःला सादर करतो.
आणि अर्थातच, आता आपण आपल्या शरीराची आणि मनाची ही आध्यात्मिक अर्पणे देण्यास सक्षम आहोत याचे सर्वात सखोल कारण म्हणजे ख्रिस्ताने स्वतःला वधस्तंभावर अर्पण करून लेवीय यज्ञव्यवस्था पूर्ण केली आहे. ख्रिस्ताने स्वर्गीय पवित्र ठिकाणी प्रवेश केला तो, “बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली” (इब्री 9:12). ख्रिस्ताने बैल आणि मेंढ्यांपेक्षा चांगले बलिदान दिले आणि स्वतःच्या बलिदानाने पाप कायमचे दूर केले (इब्री 9:26). ख्रिस्ताच्या अंतिम बलिदानाच्या आधारेच आपण स्वतःला पूर्णपणे देवाला अर्पण करतो.
इतरांच्या अर्पणांकरिता ओतले जाणे
तथापि, हे लक्षात ठेवा की फिलिप्पै. 2 मध्ये दुसर्या अर्पणाचा उल्लेख आहे ज्याच्याशी प्रेषित स्वतःला आणि त्याच्या सेवेला एकरूप करतो: “जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी . . .” पुन्हा, लेवीचे अबकड हातात घेऊन, आम्हाला आठवते की प्राथमिक वर जाणार्या अर्पणांबरोबरच प्रथम उत्पन्नाचे अर्पण किंवा अन्नार्पण यासारखी दुय्यम अर्पणे देखील होते, जे उपासकाच्या कार्याचे आणि श्रमाचे प्रतिनिधित्व करतात. वर जाणारे अर्पण हे मुख्य अन्न असेल, तर प्रथम उत्पन्नाचे अर्पण हे दुय्यम अन्न आहे.
गणनाच्या पुस्तकात आपण शिकतो की, एकदा इस्राएलने वचनदत्त देशात प्रवेश केल्यावर त्यांना केवळ अन्नार्पणच नव्हे, तर पेयार्पणही करायचे होते. त्यांना अन्नासह द्राक्षारसही ओतायचा होता. आणि येथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे: गणना 15 नुसार, वचनदत्त देशात केलेल्या प्रत्येक वर जाणार्या अर्पणासोबत अन्नार्पण आणि पेयार्पण असणे आवश्यक होते. प्रत्येक चीज बर्गर सोबत फ्राईज आणि पेय आले.
मग, त्याचा फिलिप्पैकरांशी काय संबंध आहे? पौल म्हणतो की फिलिप्पैकरांपैकी प्रत्येकाला जिवंत बलिदान म्हणून, वर जाणारे अर्पण म्हणून अर्पण केले जात आहे. आणि त्यांच्या आनंदासाठी आणि विश्वासासाठी त्याचे श्रम म्हणजे बाजूला केलेले पेयार्पण होय. त्यांचे अर्पण करता यावेत म्हणून तो ओतला जात आहे. आणि म्हणून, तो खालपर्यंत, म्हणजे मृत्यूपर्यंत ओतला जाण्यास तयार आहे.
मंडळी आणि ख्रिस्ती जीवनाचे हे एक अद्भुत, पवित्र शास्त्रोक्त, लैवीय चित्र नाही का? आपल्या सर्वांना स्वतःला पूर्णपणे देवाला अर्पण करण्यासाठी बोलावलेले आहे. “हे देवा, येशूमुळे माझे सर्वस्व तुझ्या सर्वस्वासाठी.” संपूर्ण समर्पण. आपल्यापैकी प्रत्येकजण वर जाणारे अर्पण आहोत, आपण दररोज देवाला स्वतःला अर्पण करतो, त्याच्या सत्याद्वारे आपल्या मनाचे नूतनीकरण करतो आणि आपल्या शरीराला जिवंत यज्ञ म्हणून सादर करतो. हीच आपली आध्यात्मिक उपासना आहे.
तथापि, प्रेषिताच्या उदाहरणाचे अनुसरण करून, आपल्यापैकी प्रत्येकाला इतरांसाठी पेयार्पण होण्यास देखील बोलावलेले आहे. त्यांच्या यज्ञरूपी सेवेच्या जीवनाची गौरवशाली संगत म्हणून आम्हाला ओतले जाण्याचे आवाहन केले जाते. पौलाप्रमाणे, ख्रिस्ताच्या दिवसासाठी इतरांनी शुद्ध आणि दोषरहित व्हावे म्हणून आम्ही श्रम करतो, धावतो आणि काम करतो आणि देतो. आपण स्वत:ला ओततो जेणेकरून ते स्वतःला अर्पण करू शकतील.
एकमेकांना देवाला अर्पण करणे
ही लैव्यात्मक पार्श्वभूमी ख्रिस्ती जीवनाकडे आणि इतरांची सेवा करण्याकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोणाला आकार देते. उदाहरणार्थ, ख्रिस्ती सेवेची ही दृष्टी आपल्या लेकरांचे मेंढपाळत्व करण्यासाठी आपल्या श्रमाची पुनर्रचना कशी करते याचा विचार करा. सर्वप्रथम, आम्ही मूलभूतपणे त्यांना आम्हाला आज्ञाधारकता अर्पण करण्यास सांगत नाही; विश्वासाने देवाला जिवंत यज्ञ आणि त्याची सेवा करण्याचे आमचे ध्येय आहे. जेव्हा आपण त्यांना कुरकुर करून तक्रार करू नका, तर त्याऐवजी उत्साही, आनंदी आणि पूर्ण आज्ञापालन करा असे आवाहन करतो, तेव्हा आम्ही त्यांना आनंदाने असे म्हणण्यासाठी बोलावत असतो, “हे देवा, येशू ख्रिस्त तुझा पुत्र ह्याद्वारे, माझे सर्वस्व हे तुझ्या सर्वस्वासाठी.”
किंवा ते आपल्या प्रार्थनेला कसे आकार देते याचा विचार करा. जेव्हा पौल म्हणतो की तो पेयार्पण म्हणून ओतला जात आहे, तेव्हा त्यामध्ये त्याने आपल्या पत्राच्या सुरुवातीला फिलिप्पैकरांसाठी केलेल्या प्रार्थनांचा समावेश आहे.
माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी; असे की, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे; आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. (फिलिप्पै. 1:9–11)
विपूल प्रीती, वाढती विवेकबुद्धी, कुठल्याही परिस्थितीत काय चांगलं आणि काय योग्य आहे याची शहाणपणाने मान्यता – हे देवाप्रती जगले जाणारे जीवन आहे. जर देवाने या प्रार्थनेचे उत्तर दिले, तर हे लोक शुद्ध आणि निर्दोष असतील, त्याच्या नीतिमत्वाने भरलेले जिवंत यज्ञ असतील आणि त्याला पूर्णपणे संतोष देणारे असतील. आणि आध्यात्मिक उपासनेच्या अशा देवभिरू जीवनामागे प्रेषिताच्या प्रार्थना आणि श्रम दडलेले आहेत, जे देवाच्या लोकांना देवाला पूर्ण आणि परिपूर्ण अर्पण करण्यास कृपापूर्वक मदत करतात आणि सेवा करतात.
आणि हे सगळं आनंदाने केलं जातं. पौल जेव्हा स्वतःला प्रार्थनेत आणि सेवेत झोकून देतो, अगदी मृत्यूपर्यंतही, तेव्हा तो अदम्य आनंदाने ते करतो. आणि तो फिलिप्पैकरांना त्या आनंदात सामील होण्याचे आमंत्रण देतो. “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा” (फिलिप्पै. 4:4). पौलासाठी, जगणे हे ख्रिस्त आहे, मरणे हा लाभ आहे आणि म्हणूनच, फिलिप्पैकरांच्या विश्वासाच्या प्रगतीसाठी आणि आनंदासाठी त्याने केलेले श्रम खूप आनंददायक आहेत. तो आनंदाने खर्च करतो आणि त्यांच्या आत्म्यासाठी खर्च करतो, त्यांना देवाच्या जवळ आणण्यास मदत करण्यासाठी पेयार्पण म्हणून स्वत: ला ओततो. आपल्या लिखित शब्दांतून तो आजही आपल्यासाठी तेच करतो. आणि आता आपण इतरांसाठी स्वत:ला ओतण्याच्या आनंदात सहभागी होतो.
लेखक
जो रिग्नी