समृद्धी शुभवर्तमान लोकांना कसे दुखावते

दु:ख भोगणे ही माझ्यासाठी देवाची इच्छा असू शकत नाही, असे मला सांगण्यात आले आहे. मला दु:खाबद्दल न बोलण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. जर माझ्याकडे पुरेसा विश्वास असेल तर मला बिनशर्त आरोग्य आणि संपूर्णतेचे आश्वासन देण्यात आले आहे.

ही विधाने समृद्धी शुभवर्तमानाच्या पुरस्कर्त्यांकडून आली आहेत, ज्यांना खातरी होती की मी दु:ख टाळू शकते. वीस वर्षांपूर्वी पोलिओनंतरच्या माझ्या निदानाबद्दल एका विश्वासू व्यक्तीला सांगितले होते असे मला आठवते, माझे दोन्ही हात आणि पाय अर्धांगवायूने लुळे होऊ शकतात असे स्पष्टीकरण मी दिले होते. मी त्याचे वेगवेगळे अर्थ सांगताना त्या माणसाने मला थांबवून म्हटले, “तू याबद्दल बोलणं आत्ताच थांबवायला पाहिजे. केवळ या निदानाबद्दल बोलणे म्हणजे सैतानाशी सहमत होणे असून, त्यामुळे ते अस्तित्वात येऊ शकते. दु:ख हा देवाच्या इच्छेचा भाग कधीच नसतो. मला माहीत आहे की देवाला फक्त आपल्यासाठी आरोग्य आणि संपूर्णता हवी आहे.”

त्याच्या बोलण्याने मी अचंबित झाले. हे दावे मी आधी ऐकले होते, पण या संभाषणामुळे वेदनादायक आठवणींचा पूर माझ्या मनांत आला : खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात एका रोग बरे करणार्‍याने सांगितले होते की, मला बरे होण्यासाठी पुरेसा विश्वास नाही. किराणा दुकानांपासून ते क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणांपर्यंत मला बरे करू शकतात अशी खातरी बाळगणार्‍या अनोळखी लोकांद्वारे माझ्यासाठी प्रार्थना केली जात होती. माझ्या गर्भातील मुलाच्या हृदयाच्या गंभीर स्थितीबद्दल एका मित्राला सांगितले, तेव्हा आमच्या बाळाच्या बरे होण्याचा दावा करण्यास सांगितले गेले.

या सर्व लोकांनी ठामपणे सांगितले की जर आपण “प्रार्थनेत सहमत झालो” आणि “सैतानाला बांधले,” तर मी बरी होईन, माझं बाळ बरं होईल, वेदना संपतील. ते म्हणाले की मी विश्वासावर विश्वास ठेवला पाहिजे, आणि त्यांनी मला चेतावनी दिली की मी, दु:ख, भीती किंवा नुकसान ह्याबद्दल कधीही बोलू नये.

प्रेषितही दु:खाचा चुकीचा अर्थ लावतात

प्रेषित पेत्रालाही येशूने त्याच्या क्रूसावर चढवण्याबद्दल बोलू नये असे वाटत होते. जेव्हा येशूने शिष्यांना त्याच्या भविष्यातील दु:ख, मृत्यू आणि तिसर्‍या दिवशी होणार्‍या पुनरुत्थानाबद्दल सांगितले, तेव्हा पेत्राने त्याला रागावून म्हटले, “प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही” (मत्तय 16:22). पेत्रासाठी, येशू दु:ख भोगेल आणि मारला जाईल हे अनाकलनीय होते. तो देवाच्या योजनेचा भाग होऊ शकत नाही.

कदाचित पेत्राने सहजपणे येशूला खडसावले, कारण येशूने त्याच्या दु:खाबद्दल आणि मृत्यूबद्दल सांगितलेले शब्द पेत्राच्या देवाच्या राज्याबद्दलच्या समजुतीच्या विरुद्ध होते. याआधीच येशूने पेत्राला सांगितले होते की, पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल (मत्तय 16:19). कदाचित पेत्राला वाटले असेल की तो त्या भाकितांच्या विरोधात बोलून त्यांना मागे टाकू शकतो.

पेत्राच्या उद्रेकाचे कारण काहीही असो, येशूने त्याला कडक शब्दांत खडसावले: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.” (मत्तय 16:23).

येशूची प्रतिक्रिया समृद्धी शुभवर्तमानाच्या खोट्या शिकवणुकीला लागू होते, म्हणजे एक सिद्धान्त जो असा दावा करतो की ख्रिश्चनांच्या जीवनात दु:खाला स्थान नाही. समृद्धी शुभवर्तमानाचे समर्थक बरेचदा असा दावा करतात की आपल्याला पृथ्वीवर दु:खाला बांधून ठेवण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही त्याबद्दल बोलू सुद्धा नये, कारण जे ख्रिस्ताला ओळखतात त्यांच्यासाठी दुःख ही कधीही देवाची इच्छा असू शकत नाही. आपल्या दु:खात आणि दु:खाद्वारे देवाचे चांगुलपण आणि सार्वभौमत्व अधोरेखित करणार्‍या शास्त्रवचनांकडे दुर्लक्ष करून, परिपूर्ण आरोग्याच्या अधिकारावर भर देत, ते आपले मत ठामपणे मांडण्यासाठी निवडक वचने निवडतात.

येशूने पेत्राशी केलेल्या संभाषणाच्या आधारे, समृद्धी शुभवर्तमानाला दु:ख चूक वाटण्याचे तीन मार्ग मला दिसतात.

1. ‘दु:ख विश्वासाला अडखळण आणते.’

पेत्राचे शब्द हे त्याला येशूची काळजी असल्यामुळे उद्भवलेल्या प्रेमळ प्रतिक्रियेसारखे जरी वाटत असले तरी येशूने त्यांच्याकडे सैतानाचे आणि येशूला त्याच्या उद्देशापासून विचलित करणारे कार्य म्हणून पाहिले. येशू दु:ख भोगण्यासाठी आणि मरण्यासाठी आला आणि पेत्राने त्याला देवाच्या इच्छेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. ख्रिस्ताचे दु:ख केवळ पेत्रालाच नव्हे, तर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचेच तारण करेल, हे त्यावेळी पेत्राला ठाऊक नव्हते.

येशूचे दु:ख दैवी हेतूने भरलेले होते, तसेच आमचे सर्व दु:ख देखील आहे. नंतर, पेत्र स्वतः ओळखतो की देवाने ख्रिस्ताला जसे दु:ख भोगण्यासाठी बोलवले तसेच देव काही लोकांना सुद्धा दु:ख भोगण्यासाठी बोलावतो (1 पेत्र 2:21), आणि दु:ख आपला विश्वास शुद्ध करू शकते आणि देवाचा गौरव करू शकते (1 पेत्र 1:6–7).

याचा अर्थ असा नाही की जेव्हा संकट येते तेव्हा आपण बरे होण्यासाठी आणि सुटकेसाठी प्रार्थना करू नये. देव आपल्याला आमच्या विनंत्या त्याच्याकडे आणण्यास सांगतो (फिलिप्पै. 4:6), मोठ्या प्रार्थना करून आणि मोठ्या उत्तरांची अपेक्षा करणे (याकोब 5:16), आपल्याला हवे ते मागणे (योहान 15:7). आपल्याला माहीत आहे की देव केवळ शब्द बोलून बरे करू शकतो — त्याने केवळ आपल्या शब्दाने विश्वाची निर्मिती केली, समुद्र शांत केला आणि मृतांना उठवले. पण त्याचं उत्तर नेहमी “हो” असे नसते. जर देवाने आपणास त्याने ईयोब, येशू आणि पौलाला म्हटल्याप्रमाणे “नाही” किंवा “थांबा” असे म्हटले, तर आपण असा निष्कर्ष काढू नये की आपला विश्वास कमकुवत आहे किंवा आपण काहीतरी चुकीचे केले आहे.

जर देवाने आपल्या कळकळीच्या विनंत्या नाकारत असेल तर त्याच्याकडे त्याची कारणे आहेत – कदाचित दहा हजार कारणे – आणि एक दिवस आपण त्यामध्ये आनंदित होऊ, या गोष्टीने आपण सांत्वन पाऊ शकतो. दु:खाद्वारे देवाचा उद्देश आपल्यात धीर, चारित्र्य आणि आशा निर्माण करणे आहे (रोम. 5:3–5). परीक्षा आपल्यामध्ये धीर उत्पन्न करतात (याकोब 1:3), देवावरील आपले अवलंबन अधिक दृढ करतात (2 करिंथ. 1:8–9), आणि देवाने आपल्याला सांत्वन दिल्याप्रमाणे इतरांना खऱ्या अर्थाने सांत्वन देण्यास मदत करतात (2 करिंथ. 1:3–4). देव आपल्या दु:खाद्वारे काय करत आहे हे आपल्याला माहीत नसले तरी तो नेहमीच आपल्या कल्याणासाठी कार्य करतो याची आपण खातरी बाळगू शकतो (रोम. 8:28).

2. ‘देवाला आमच्यासाठी नेहमीच सांत्वन हवे असते.’

येशूने आपल्या मृत्यूची जी भविष्यवाणी केली होती, त्याचा पेत्राला अर्थ कळत नव्हता. तो मसीहा आहे हे ओळखल्याबद्दल येशूने नुकतीच त्याची स्तुती केली होती (मत्तय 16:16–17).  मसीहा जगीक राज्य स्थापन करेल असे पेत्राला वाटले होते का? एक असे राज्य ज्याचा पेत्र एक महत्त्वाचा भाग असेल?

“जर देवाने आमच्या विनंत्या नाकारल्या तर त्याच्याकडे त्याची कारणे आहेत – कदाचित दहा हजार कारणे – आणि एक दिवस आपण त्यामध्ये आनंदित होऊ.”

बरेचदा देवाच्या राज्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला काय हवे आहे यावर केंद्रित असतो. या जीवनात आधारलेल्या आपल्या योजना आणि आपल्या वैभवाने आपण भारावून गेलेले आहोत. परंतु देवाच्या गोष्टी देवाच्या इच्छेवर आणि देवाच्या गौरवावर केंद्रित आहेत, ज्या अनंतकाळावर आधारित आहेत. पेत्राप्रमाणेच, समृद्धी शुभवर्तमानाचे पुरस्कर्ते बरेचदा उत्कट विश्वास आणि देवाकडून प्रकटीकरणाने प्रारंभ करतात, परंतु त्यांचे मन ऐहिक आशीर्वादांवर इतके केंद्रित असते की ते देवाच्या उद्देशांच्या विरूद्ध कार्य करतात. दु:ख आणि मृत्यू सुद्धा देवाच्या योजनेचा भाग असू शकतो हे जे लोक स्वीकारू शकत नाहीत त्यांचे मन माणसाच्या गोष्टींवर केंद्रित असते.

आपण देवाच्या गोष्टींवर आपले मन कसे केंद्रित करू शकतो? त्याचे मार्ग हे आपले मार्ग नाहीत हे ओळखून आपण सुरुवात करू शकतो (यशया 55:8), आणि केवळ आत्म्यालाच देवाच्या सखोल गोष्टी माहीत आहेत (1 करिंथ. 2:11). जर ते विश्वास ठेवत असतील तर देवाला त्यांच्या दु:खाचा अंत करण्याची इच्छा आहे असे म्हणून आपण लोकांच्या बरे होण्याची हमी किंवा खातरी देऊ शकत नाही, परंतु आम्ही त्यांच्यावतीने परमेश्वराकडे प्रार्थना करू शकतो आणि परिणामाकरिता त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो.

3. ‘हेच जीवन आहे.’

पेत्राने येशूला खडसावताना मत्तय 16:21 मधील त्याच्या विधानाच्या शेवटच्या भागाकडे दुर्लक्ष  केले : येशू केवळ मरणार नाही तर तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. हा एक आश्चर्यकारक निष्कर्ष आहे, जो येशूच्या सुरुवातीच्या शब्दांच्या भयानकतेला कमी करतो. दु:खाला शेवटचा शब्द असणार नव्हता आणि मृत्यूही त्याला धरून ठेवू शकणार नव्हता. येशूचे पुनरुत्थान म्हणजे आपल्या सर्व जगीक वेदनांचा गौरवशाली अंत होय.

समृद्धी शुभवर्तमानाचे पुरस्कर्ते अनेकदा स्वर्गात प्राप्त होणार्‍या गौरवाकडे दुर्लक्ष करतात आणि केवळ या जीवनावर लक्ष केंद्रित करणे पसंत करतात. दु:ख आपल्याला त्या भावी वैभवासाठी तयार करते, कदाचित त्याबद्दलचा आपला अनुभव देखील वाढवते आणि आपल्याला स्वर्गासाठी आतुर बनवते (2 करिंथ. 4:17).

अनंतकाळ आपल्या विश्वासाकरिता इतका केंद्रिय आहे की जर स्वर्ग आपली वाट पाहत नसेल, जर हे जीवनच सर्व काही असेल, जर ख्रिस्तावरील आपली आशा केवळ या जीवनासाठीच असेल तर पौल म्हणतो की, “तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत” (1 करिंथ. 15:19). पण जर समृद्धी शुभवर्तमानाचे दावे खरे असतील – की येशूचे अनुसरण करणे म्हणजे नेहमीच ऐहिक समृद्धी – तर ख्रिस्ताला मृतांमधून उठवले गेले नसले तरी, ख्रिश्चनांना अजिबात लाचार गणले जाऊ नये. स्वर्ग हा लाभांश असेल, पण या जीवनाचे भौतिक आशीर्वाद पुरेसे बक्षीस असतील.

आम्हा सर्वांसाठी धडा

पेत्राला दु:खाविषयीचे हे धडे शिकण्याची गरज होती आणि आम्हालाही आहे. विश्वासणार्‍या व्यक्तीसाठी, दु:ख हा शाप नाही, कमकुवत विश्वास किंवा आशीर्वादाच्या कमतरतेचे लक्षण नाही, तर ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य भाग आहे. देव आपल्याला जागृत करण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठी शिस्त लावू शकतो, परंतु त्याची शिस्त ही एक प्रीतीपूर्ण दया आहे. तो दु:खाचा उपयोग आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेत आकार देण्यासाठी करतो, ज्याकडे समृद्धी शुभवर्तमान, शारीरिक आरोग्य आणि ऐहिक संपत्तीच्या वेडात दुर्लक्ष करते.

येशूने आमच्यावतीने दुःख भोगले आणि जर आपण त्याच्या पावलावर पाऊल ठेवले तर आपण स्वतःच्या दु:खाबद्दल आश्चर्यचकित होऊ नये. खरं तर, येशूने वचन दिले होते की, आम्ही दुःख भोगू, “जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे” (योहान 16:33).

म्हणून जर तुम्हाला दु:ख होत असेल तर देवाला हाक मारा. जरी असे वाटत असेल की तो ऐकत नाही, तरी प्रार्थना करा आणि पवित्र शास्त्र वाचा. दु:खात असलेल्या इतरांना तुम्ही ओळखत असाल, तर त्यांच्यासाठी हजर राहा. त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्याबरोबर प्रार्थना करा, त्यांचे लक्ष देवाच्या अनंतकालिक हेतूंकडे वेधा. खरी सुवार्ता दु:खापासून मुक्त जीवनाचे अभिवचन देत नाही, तर अशा देवाचे अभिवचन देते जो आपल्या दु:खात आपल्यासोबत आहे, जो आपल्या दु:खांपासून आपली सुटका करतो आणि त्या दु:खाचे रूपांतर करतो आणि आपल्याला अनंतकाळासाठी तयार करतो. म्हणून, देवाच्या गोष्टींवर आपले मन केंद्रित करा, आणि हे लक्षात ठेवा की आपले अंतिम पारितोषिक येथे पृथ्वीवर नाही, तर स्वर्गात साठवले गेले आहे, तेथे यापुढे दु:ख असणार नाही, अश्रू असणार नाहीत आणि वेदना सुद्धा असणार नाहीत.

लेखक

वनिता रेन्डल रिझनर

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *