लेखक

डॅनियल जे ब्रेंडसेल

“एखाद्या व्यक्तीचे खरे सत्य हे प्रथमतः आणि मुख्यतः त्याने काय लपवले आहे यावरून समजते,” असे 1967 मध्ये फ्रेंच कादंबरीकार, कला समीक्षक, आणि राजकारणी आंद्रे मालरो यांनी त्यांच्या (अँटी-मेमोअर्स-5/ Anti-Memoirs, 5) या पुस्तकात लिहिले आहे. मानवजातीच्या स्थितीचे त्यांनी केलेले हे गंभीर विश्लेषण खरे ठरते. आपण कोण म्हणून ओळखले जावे, हे दाखवण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो, पण आपण खरोखर कोण आहोत, ते लपवतो.

आपण या अंतर्दृष्टीच्या नकारात्मक बाजूचा प्रथम विचार करू.  आपण कपाटात एखादा सांगाडा लपवावा तशी आपली गुप्त पापे, गुप्त वासना आणि गुप्तरीत्या करत असलेली मूर्तीपूजा व्यवस्थित लपवून ठेवतो, कारण आपल्याला असे वाटते की, “जर इतरांना माझ्या खऱ्या स्वरूपाबद्दल कळले, तर ते मला नक्कीच नापसंत करतील.” हे आपल्याला चांगल्याच प्रकारे ठाऊक आहे की, जे आपण लपवतो तेच आपले खरे अस्तित्व असते.

परंतु या अंतर्दृष्टीची एक सकारात्मक बाजू देखील आहे आणि आपला प्रभू तिचे कौतुक करतो असे म्हणता येईल. येशू आपल्याला आपल्या अंतःकरणाच्या सर्वात जवळ असलेल्या गोष्टी लपविण्यास प्रोत्साहित करतो: “माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केलीत तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही” (मत्तय 6:1). लोकांची स्तुती आणि कौतुक मिळवण्यासाठी आपण जे काही करतो ते करण्याचा एक सामान्य आणि तीव्र मोह आपल्यासमोर असतो. धार्मिकतेपेक्षा नीतिमत्तेचे प्रकटीकरण आपल्यासाठी सहज महत्वाचे ठरू शकते. परंतु खरी धार्मिकता फक्त प्रकट करण्याची गोष्ट नाही, तर ती लपवण्याचीही गोष्ट आहे. अशा प्रकारे येशूने धार्मिकतेचे आचरण करण्याचा उपदेश केला आहे— दानधर्म, प्रार्थना आणि उपवास — हे “गुप्तपणे” करावे (मत्तय 6:2-18).

गुप्त प्रार्थनेचे आवाहन

दानधर्म, प्रार्थना, आणि उपवास याबद्दल येशूंची शिकवण आणि चेतावणी या एकमेकांशी जुळलेल्या आहेत. आपले उद्दिष्ट इतरांकडून मिळणाऱ्या तात्पुरत्या  सन्मानाच्या अपेक्षेमुळे दूषित होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी (मत्तय 6:2,5,16). तरीसुद्धा, या तिघांमध्ये प्रार्थनेला मध्यवर्ती स्थान आहे.त्याचे कारण केवळ ती यादीत मध्यभागी असल्यामुळे नाही. येशू प्रार्थनेविषयी जितके मार्गदर्शन देतो, ते दानधर्म आणि उपवास यांच्याविषयीच्या शिकवणीपेक्षा दुप्पट आहे. शिवाय, प्रार्थनेविषयी बोलताना येशू केवळ इतरांकडून प्रशंसा मिळवण्याच्या चुकीच्या उद्दिष्टाचा निषेध करत नाहीत, तर आणखी एका चुकीच्या प्रेरणेबद्दलही चेतावणी देतो.

“तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते” (वचन 7). येथे असे दिसून येते की, “गैरयहूदी लोक” मुख्यतः त्यांच्या गरजा आणि इच्छांची पूर्तता व्हावी, यासाठी प्रार्थना करतात. त्यांच्या मते प्रार्थना म्हणजे केवळ त्या उद्देशापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. म्हणून, ते बरेच शब्द गोळा करतात—कदाचित असा विचार करतात की, देवाला आपल्या गरजांची यादी कळविणे आवश्यक आहे, किंवा दीर्घ काळ चालणारी व्यर्थ बडबड त्याला ती कृती करण्यास प्रवृत्त करेल किंवा एक उंबरठा ओलांडण्यासाठी “सत्य” च्या विपुल अभिव्यक्तीची आवश्यकता आहे.

येशू अशा सर्व चुकीच्या दृष्टिकोनांना सुरुवातीलाच रोखतो : “तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे’ (वचन 8). यावरून अगदी स्पष्ट होते की, एखादी गोष्ट देवाला कळवण्यासाठी आपल्याला जास्त काळ प्रार्थना करण्याची गरज नाही. देवाला उदारता आणि काळजी घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी लांब प्रार्थनेची आवश्यकता नाही; कारण पित्याला आपल्या गरजांचे ज्ञान असणे हेच याचे संकेत देते की तो आपल्यासाठी, त्याच्या मुलांसाठी, पुरवठा करण्याचा निर्धार ठेवतो. ज्यांना तो आकाशातील पक्षी आणि रानफुले यांच्या पेक्षा जास्त प्रेम करतो (मत्तय 6:25-34), आणि याच प्रेमापोटी त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून त्यांना दगड किंवा नाग देण्याचे स्वप्नातही विचार करणार नाही (मत्तय 7:7-11).

गुप्त प्रार्थना म्हणजे पित्याच्या आपल्यावरील प्रेमळ दृष्टीकोनाला मिळवण्याचा प्रयत्न नाही. येशूंच्या दृष्टीने, पित्याचे प्रेमळ लक्ष आणि आपल्याला पुरवण्याची योग्यतावादी उद्दिष्टे ही आपली प्रार्थना करण्यापूर्वीच अस्तित्वात आहेत आणि तीच आपल्याला प्रार्थनेसाठी आमंत्रित करतात. म्हणूनच, प्रार्थनेच्या खोलीत प्रवेश करताना आपल्यासाठी चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी चिंताग्रस्त होण्याचे काही कारण नाही.

गुप्त प्रार्थनेचे केंद्रस्थान

जर प्रार्थना म्हणजे केवळ आपल्याला हव्या असलेल्या किंवा गरजेच्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न मानला जात नसेल आणि जेथे दुसरे कोणी पाहत नाही तेथे ती गुपचूप करायची असेल तर तिला कशामुळे प्रेरणा मिळते? आपल्या गुप्ततेत पाहणाऱ्या पित्याशी संवाद साधण्याची आणि त्याच्यावर प्रेम करण्याची साधी इच्छा नाही का?

आपण जे लपवतो तेच आपण असतो, कारण आपण जे गुप्तपणे — कपाटात लपवून ठेवतो, ते इतर कोणालाही पाहता येत नाही — आणि तेच आपल्याला आवडते, तेच आपण आहोत.

म्हणूनच, टिम केलर गुप्त प्रार्थनेला “आध्यात्मिक प्रामाणिकतेची अचूक कसोटी” असे म्हणतात (प्रेयर, 23/ Prayer,23). याचा अर्थ असा नाही की “गुप्तपणे” दानधर्म करणे आणि उपवास करणे ही आध्यात्मिक प्रामाणिकतेची कसोटीचे साधन नाहीत. परंतु गुप्त दानधर्म आणि उपवासामागील प्रेरणा देवावरील साध्या प्रेमाइतकी स्पष्टपणे दिसून येत नाही. उदाहरणार्थ, परोपकाराची भावना गुप्त दानधर्मास चालना देऊ शकते (जे निश्चितच उपेक्षणीय नाही). आणि केवळ स्वतःला सुधारण्याची इच्छा गुप्त उपवासासाठी प्रेरक ठरू शकते (उदाहरणार्थ, ‘मी वाईट सवय सोडण्यासाठी ‘तंत्रज्ञानात्मक उपवास’ करतो आहे!)”

गुप्त प्रार्थनेत मात्र, आपले प्रेम सर्वात स्पष्टपणे प्रकट होते. हीच आपल्या आत्म्याच्या अखंडतेची आणि देवापुढील निष्ठावान मनाची निर्णायक आणि अपरिहार्य कसोटी आहे, जी दुटप्पीपणा किंवा विभागलेपणापासून वेगळी आहे.

गुप्त प्रार्थनेतील गुंतागुंत

गुप्त प्रार्थना नेहमीच देवावरील प्रेमाच्या उष्ण प्रवाहातून उगम पावते, असे वाटेलच असे नाही. पण अशा भावना नसल्यामुळे गुप्त प्रार्थनेचा सराव सोडून देऊ नये. याउलट, हेच आपल्या प्रार्थनेच्या सुरुवातीसाठी महत्त्वाचे सूप्तांग आहे: आपल्या “आंतरिक अंधत्वाचा, अविश्वासाचा, शंका-कुशंका [आणि]  निर्बल मनोवृत्तीचा” (1563 च्या पॅलेटिनेट चर्च ऑर्डरनुसार/1563 Palatinate Church Order puts it) प्रामाणिक स्वीकार आणि “तुझ्या तारणाचा . . . आनंद ” आणि “एक इच्छूक आत्मा” पुनर्स्थापित केला जावा (स्तोत्र 51:12).

ख्रिस्ती जीवनात आपण अनेकदा उष्णतेच्या विहिरीतून जातो, ती उष्णता मिळवणे आपला हेतू नसतो तर त्यातूनच आपण एका गुप्त प्रार्थनेकडे एक तळमळीने आणि विनवणी करीत वाटचाल करीत असतो — ती अशी. “हे ख्रिस्ता, मी तुझ्यावर अधिक प्रेम, तुझ्यावर अधिक प्रीती करतो!” अशी. स्तोत्रकार देवाला कबूल करतो, “माझे मन खिन्न झाले व माझे अंतर्याम व्यथित झाले. मी तर मूढ व अज्ञानी होतो; तुझ्यापुढे मी पशुवत होतो” (स्तोत्र 73:21-22); परंतु, जरी “माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे” (वचन 26). हेच शहाणपणाचे वर्तन आहे.

आपल्या दुर्बलतेचा प्रामाणिक स्वीकार केल्यानंतर, गुप्त प्रार्थनेत आपण देवाशी काय बोलावे याचा विचार येतो. पश्चात्ताप आणि आत्मिक नवचैतन्याच्या विनंतीच्या पुढे जाऊन, गुप्त प्रार्थनेत काय करावे आणि काय म्हणावे, याचा उलगडा अनेकदा क्लिष्टमय असतो. या संदर्भात, काही उपयोगी सल्ला मी देतो.

पवित्रशास्त्र/ पवित्र शास्त्राच्या आधारे प्रार्थना

एकीकडे, आपण प्रार्थना करताना पवित्र शास्त्र उघडे ठेवावे. जशी तलवार हातात घेण्यासाठी असते, तशीच आत्म्याची तलवार म्हणजेच देवाचे वचन, हात जोडलेल्या प्रार्थनेसाठी विशेषतः उपयुक्त आहे. देवाचे वचन आपल्या प्रार्थनेला मदत करते, प्रेरणा देते आणि तिचे स्वरूप घडवते, आणि तेही विविध प्रकारे. सुरुवातीसाठी, ते आपल्याला प्रार्थनेसाठी शब्द प्रदान करते. विशेषतः स्तोत्रांद्वारे प्रार्थना करण्याचा विचार येथे योग्य ठरेल. प्रार्थनेसाठी स्तोत्र हे आत्म्याचे एक वरदान आहेत, जे आपल्याला प्रार्थनेच्या खोलीत प्रवेश करताना आपली भावना व्यक्त करण्यासाठी साहाय्य करतात.

स्तोत्र हे एक प्रकारचे “दैवी प्रेरित भाषण प्रशिक्षण” होऊ शकते, जे आपल्या ओठांच्या आणि हृदयाच्या अविकसित स्नायूंना देवाच्या गौरवाची  स्तुती आणि गौरव करणाऱ्या प्रार्थना (तसेच शोकप्रार्थना किंवा विधवांसाठी व अनाथांसाठी विनंती प्रार्थना) शिकवतात.

येथे एक महत्त्वाचा गृहीतक आहे: आपल्याला प्रार्थना शिकवली जावी लागते. निरोगी प्रार्थना ही केवळ स्वाभाविक आणि आपोआप होणारी प्रक्रिया नसते. शिष्यांनी येशूला प्रार्थना कशी करावी याची  शिकवण द्यावी अशी मागणी केली, ते योग्यच होते (लूक 11:1). आणि प्रभू त्यांना तशी शिकवण प्रेमपूर्वक आणि शहाणपणाने देतो. परंतु त्यांची शिकवण देण्याची पद्धत महत्त्वाची आहे. येशू फक्त प्रार्थनेबद्दल चर्चा करत नाहीत किंवा तिच्या स्वरूपाबद्दल, तर्काबद्दल, आणि प्रेरणांविषयी बोलत नाहीत.

येशू त्यांना एक विशिष्ट स्वरूप आणि प्रार्थनेचे खरे शब्द देतो, ज्याला आपण प्रभूची  प्रार्थना असे म्हणतो (लूक 11:2–4; मत्तय 6:9–13). देवपुत्राची प्रार्थनेची शिकवण त्याच्या पित्याच्या शिकवणीसारखीच आहे, ज्याचा आत्मा स्तोत्रांना प्रेरणा देतो: तो आपल्या लोकांना प्रार्थना करण्यासाठी प्रारंभिक शब्द देतो.

मौन बाळगणे

दुसरीकडे, गुप्त प्रार्थनेत मौन टाळले जाऊ नये. “ऐकण्यासाठी जवळ येणे हे मूर्खांच्या बलिदान देण्यापेक्षा चांगले आहे” असे उपदेशक ठामपणे सांगतो.. खरोखरच, “माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे,म्हणून तू माझ्या ज्ञानशिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे”(उपदेशक 5:1-2). प्रार्थनेची खोली ही प्रथम ऐकण्यासाठी आणि शांततेत मनन करण्याचे ठिकाण आहे, जेथे योग्य शब्द सापडण्यापूर्वी आपण देवासमोर शांततेने उघड होतो. पवित्र वचनांवर —शांत चिंतन आणि देवासमोर पारदर्शकतेत असणे, ही गुप्त प्रार्थनेची प्राथमिक वैशिष्ट्ये आहेत.

निश्चितपणे, शांतता बऱ्याच वेळा अस्वस्थ करणारी वाटू शकते, आणि कदाचित याच कारणामुळे गैरयहूदी लोकांमध्ये” सतत बडबड करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. कदाचित त्यांच्या मनाच्या मुळाशी ही भावना असते की, देवाचे प्रेम आणि काळजी मिळवण्यासाठी त्यांना अनेक शब्दांची गरज आहे, कारण त्यांना वाटते की सामान्य परिस्थितीत देव त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

देवापुढे आपल्या स्थितीबद्दल विश्वास नसल्यास, एकांताची शांतता प्रचंड भयावह ठरू शकते. कारण तेथे मी माझ्या देवासमोर, माझ्या प्रभूसमोर, माझ्या न्यायाधीशासमोर, पूर्णपणे एकटा असतो. आणि जे खरे “मी” आहे, जे मी इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न करतो, ते गुप्त गोष्टी पाहणाऱ्या देवासमोर लज्जा आणि भयाशिवाय काहीही का जाणवेल? अशा भितीदायक अनिश्चिततेमुळे गुप्त प्रार्थनेतील मोठ्या गुंतागुंतींना सामोरे जावे लागते.

गुप्त प्रार्थनेसाठी दिलासा

यात महत्त्वाचे म्हणजे आपला प्रभू  गुप्तपणे पाहणाऱ्या पित्याविषयी बोलतो, या गोष्टीवर त्याचा भर स्पष्ट आणि ठाम आहे: मत्तय 6:1-18 मध्ये, देवाचा उल्लेख केवळ पित्याच्या रूपात करतो, आणि तोही दहापट (वचन 1, 4, 6 [2x], 8, 9, 14, 15, 18 [2x]). येशू आपल्याला हे जाणवून देऊ इच्छितो की, गुप्त ठिकाणी आपल्याकडे पाहणारा देव हा पित्याच्या नात्याने आपल्याशी संबंधित आहे.

पण देव हा केवळ परमेश्वर आणि न्यायकर्ता नाही, तर पिता आहे, हे आपण खात्रीने जाणून घेऊ शकतो का? आपण हे जाणून घेऊ शकतो कारण जो अशा प्रकारे देवाबद्दल बोलतो, जो आपल्याला त्याच्याबरोबर (त्याच्यात) “आमच्या पित्याची” प्रार्थना करण्यासाठी आमंत्रित करतो. (मत्तय 6:9; तसेच पहा योहान 16:23, 26–27; 20:17), तोच सार्वकालिक पित्याचा पुत्र आहे, ज्याने आपल्या पित्याला “अब्बा” म्हणण्याचा आनंद त्याने नेहमीच अनुभवला आहे. येशूने पित्याचे अस्तित्व आणि त्यांचे प्रेम प्रकट करण्यासाठी या जगात आगमन केले.

देव पिता देवाच्या प्रेमळ योजनेनुसार, पुत्राला जगात पाठवले गेले —त्याच्या जीवनाद्वारे, मृत्यूद्वारे, पुनरुत्थानाद्वारे आणि स्वर्गारोहणाद्वारे— मोठ्या सुटकेच्या एका कार्याची पूर्ती झाली (गलती.1:3-4). ख्रिस्तावर विश्वास ठेवून, आपण आपल्या पापापासून मुक्त होतो आणि देवाची प्रिय मुले म्हणून दत्तक घेतले जातो. खरोखर, देवाचा दत्तक घेण्याचा आत्मा आपल्या अंतःकरणात ओतला जातो. आणि हा आत्मा काय करतो? तो आपल्याला “अब्बा, पिता!” अशी पित्याची हाक देण्याच्या अद्भुत विशेषाधिकाराकडे मार्गदर्शन करतो (गलती 4:4-6). येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेमुळे, प्रभूच्या प्रार्थनेच्या पारंपारिक आमंत्रणाप्रमाणे, आपण अशी प्रार्थना करण्याचे धाडस करतो, “हे आमच्या स्वर्गातील पित्या. . .”

ख्रिस्तामध्ये, आपल्याला देवाचे आपल्यावरील प्रेम, त्याची कृपा आणि आपल्याबद्दलची निगराणी याबद्दल काहीही शंका असण्याचे कारण नाही. आपल्याला देवाचे लक्ष आणि कृपा मिळवण्यासाठी योजना आखण्याची किंवा जास्त बोलण्याची गरज नाही. आपल्या मनातील अनिश्चितता आणि भीतीने प्रार्थनेच्या गुप्त जागेच्या मार्गात अडथळा आणण्याची गरज नाही. त्याऐवजी, आपण वारंवार सुवार्तेकडे वळू शकतो, आपल्या पित्याचे आपल्यावर असलेले प्रेम, जे देहधारी झाले आहे, ते जाणू शकतो आणि त्याच्याबद्दलचे प्रेम आपल्या हृदयात उसळून येत आहे, हे अनुभवू शकतो. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक गुप्त, शांत आणि निर्बाध ठिकाण शोधणे, हे पित्याबद्दल प्रेमाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योग्य कारण आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *