आपल्याला देवाला पाहण्यापासून कोणते अडथळे रोखतात?

लेखक: क्लिंटन मॅनली

हे विश्व परमेश्वराच्या तेजस्वितेने न्हालेलं आहे.”— गेरार्ड मॅनली हॉपकिन्स यांच्या लेखणीमधून उतरलेली ही प्रसिद्ध काव्यपंक्ती तुम्ही कदाचित ऐकली असेल. हॉपकिन्सच्या संपूर्ण काव्यलेखनामागील उद्देश हाच होता की लोकांना या दैवी आनंदात न्हालेल्या जगाचे दर्शन घडावे—असे जग, जे सर्वत्र देवाच्या वैभवाचे प्रकटन करते. हे एक थक्क करणारे वास्तव आहे; परंतु देवाच्या लेकरांसाठी देवाच्या वैभवाची खोली अधिक अगाध आहे.

ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांच्या बाबतीत सांगायचे तर, या सृष्टीतील तेज हे कोणत्यातरी अनामिक देवतेचे नसून, ते आपला प्रेमळ पिता जसा आहे, त्याच्या स्वरूपाचे प्रतिबिंब आहे. “त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत; परमेश्वराच्या वात्सल्याने ही पृथ्वी भरली आहे” (स्तोत्रसंहिता 33:5, BSI). म्हणूनच, या जगात आपण जे आनंद अनुभवतो, तेही पित्यानेच दिलेले आनंद असतात (त्याच्या हृदयातून उमटलेली पितृसुलभ सुखदायिनी भेट). या सृष्टीतील सौंदर्य म्हणजे आपल्या पित्याच्या चेहऱ्यावरचे हास्य जणू निर्मिलेल्या वस्तूंमध्ये प्रकट झालेले प्रतिबिंबच. आणि—हे खरेच अद्भुत आहे—आपला स्वर्गीय पिता आपल्या आनंदात स्वतः आनंद मानतो. जसा एखादा आनंदी पिता नाताळच्या सकाळी आपल्या मुलांच्या हर्षोल्हासात रमतो. तसेच प्रकाशाचा पिता आपल्यावर कृपापूर्वक सर्व गोष्टी भरभरून उधळतो—जेणेकरून आपण प्रत्येक उत्तम वस्तू देणाऱ्या परमेश्वरात आनंद मानू शकू (याकोब 1:17). तर मग देवामध्ये असलेल्या अशा आनंदात हरखून जाण्यापासून आपल्याला कोण रोखू शकते?  

आपणच नाही का? आणि तेही प्रत्येक दिवशी? हट्टी मुलांसारखे आपण अनेकदा लोभी, आत्मकेंद्रित वा इतर गोष्टींनी इतके विचलित झालेले असतो की, आपल्या पित्याच्या देणग्यांमध्ये त्याला पाहण्याचे भानच आपल्याला राहत नाही. एक क्षण स्वतःकडे पाहा. आज सकाळी तुम्ही सूर्योदयाचा आनंद घेतला का? मी इतकंच विचारत नाही की तुम्ही सूर्योदय होतांना पाहिला का, तर हे की, सूर्य क्षितिज ओलांडून आकाशात चढत असताना ते वैभवी दृश्य पाहून तुम्ही थक्क झालात का? त्या तेजस्वी प्रकाशाच्या आणि रंगछटांच्या जाहीर जल्लोषात तुम्ही रमलात का? किंवा, जर तुम्ही “निसर्गप्रेमी” नसाल, तर मग एक कप गरम-गरम चहा किंवा कॉफीचा प्रत्येक घोट घेतांना तुम्हाला आनंद मिळाला का? चांगल्या मोज्यांच्या उबदारपणात? तुमच्या मुलाच्या हास्यामध्ये? खरंच, तुम्ही आपल्या पित्याने दिलेल्या कोणत्याही देणगीकडे जागरूकपणे पाहिलं का?

तुम्ही पाहू शकता की, सी.एस. लुईस यांनी देवामध्ये आनंद घेणे ह्या बाबीला “आनंदवादाचे[1] कठीण शिस्तपालन” असे का म्हटले, यामागचे कारण स्पष्ट आहे. आनंद ही गोष्ट जरी श्रमसाध्य असली, तरी ती अनंत काळासाठी लाभदायक आहे. लेटर्स टू मॅल्कम या पत्रसंग्रहात लुईस लिहितात, आपण देवाच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु आपण त्यापासून पळ काढून कुठेही दूर जाऊ शकत नाही. हे जग त्याच्याने गच्च भरलेले आहे. तो सर्वत्र अप्रकट स्वरूपात विहरत असतो” (पान क्र. 101 हा आनंद म्हणजे त्याच्या अस्तित्वाचे ठसे, —आपल्याला ते सतत आठवण करून देतात की तो येथेच आहे. आनंद हे तेजाचे असे किरण असतात, जे आपल्या संवेदनांना स्पर्श करतात (पान क्र. 121). 

मग जर लुईस यांचे शब्द खरे आहेत आणि आपण देवाच्या उपस्थितीपासून कुठेही पळू शकत नाही, तर आपण इतक्या सहजपणे—कधी जाणीवपूर्वक, कधी नकळत- देवाच्या आनंदापासून कसे पळ काढतो? आपले लक्ष आपल्या पित्याच्या देणग्यांतील आनंदाकडे लागण्याऐवजी ते इतके सहज कसे विचलित होते? लुईस ह्यासाठी तीन कारणे देतात, जी विचार करण्यासारखी आहेत.

लोभ

लुईस सर्वप्रथम सहज टिपता येईल अशा कारणाने सुरुवात करतात: लोभ. का? कारण लोभ परमेश्वराने ठरवून दिलेल्या वेळ, मर्यादा वा प्रकारांबाहेर त्या आनंदांचा हाव घेत—त्यांना भ्रष्ट करून टाकतो. आपण सगळेच सहजतेने त्या विस्मयशून्य पापांकडे भरकटण्याची प्रवृत्ती बाळगतो.

लोभ हा एक विषाक्त सर्पासारखा राक्षस आहे— तो खजिना जमवतो, त्याचा संचय करतो, आणि त्याच्यावर पहारा देत निवांत पडून राहतो. लोभ कधीही तृप्त होत नाही; तो सतत अधिकाची मागणी करतो. लुईस ह्या वृत्तीला “एन्कोर” म्हणजे “पुन्हा हवे’ या आतुरतेचा लोभ असे संबोधतात. हा एक धोकादायक शब्द कोणत्याही सीमांना ओळखत नाही, कोणतेही योग्य वेळ वा लय ओळखत नाही. तो नेहमीच अतिरेक करतो. त्याला “आणखी फक्त एकदा” असे म्हणणे फार प्रिय असते.

दुर्दैवाने, आपल्या ग्राहककेंद्रित समाजाची जवळपास संपूर्ण रचना आपल्याला अशी “एन्कोर”ची मागणी करण्याची मुभा देण्यासाठीच आहे—एक अशा आवाजात, ज्याचा कोणीही प्रतिकार करू शकत नाही. आणि जेव्हा ही मागणी पूर्ण होत नाही, तेव्हा तो राक्षस कुरकुरतो—आणि मोठ्या आक्रोशाने कुरकुरतो. तरीही लुईस यांना विश्वास नाही की देव या “आणखी फक्त एकदा”म्हणणाऱ्या अनावर ओढीला कधीही मान देतो. असीम देव स्वतःची पुनरावृत्ती कशी करणार? अवकाश आणि कालमानदेखील त्याच्या व्यक्त होण्यासाठी इतके अपुरे आहेत की, त्यात तो स्वतःला एकदाच प्रकट करतो, तरी तेच पुरेसे ठरते” (पान क्र.35). आणि गंमत म्हणजे, ही “एन्कोरची आणखी फक्त एकदा” मागणी फारच कमी गोष्टींनी समाधानी होते! देव आपल्याला जितके मिळवायचे आहे त्यापेक्षा अधिक देऊ इच्छितो. आपण कितीदा आपल्या वर्तमान आनंदालाच मलिन करतो, कारण आपण देवाने एकदा जे दिले, तेच तेच पुन्हा पुन्हा मागत राहतो.

परंतु लोभ नेहमीच अग्नी आणि विनाश यांच्या गर्जनेत स्वतःची घोषणा करत नाही. कदाचित लोभाचे सर्वात कपटी रूप तेव्हा दिसते, जेव्हा आपण देवाच्या देणग्यांचा उपयोग करतो, पण त्या नेमक्या काय आहेत — ह्याचे भान न ठेवता — त्यांचा खरा आनंद घेत नाही. लुईस यांनी यालाच “क्विडिटी” — म्हणजेच वस्तूंचे विशिष्ट, तत्त्वमय अस्तित्व — असे संबोधले आहे (सरप्राइझ्ड बाय जॉय, पान 244).अशा लोभाच्या स्वरूपात आपण मधाचे मधुरपण अनुभवले नाही तरी त्याच्याकडून शहाणपण शिकण्याचा अट्टहास करतो (नीतिसूत्रे 24:13–14). आपण पक्ष्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेत नाही, पण त्यांची झेप पाहून आपली चिंता शमवायचा प्रयत्न करतो (लूका 12:24). आपण सूर्याच्या तेजात न भिजता, त्याच्या एरिक लिडेल यांनी घेतला तसा आनंदाचा अनुभव न घेता, त्याला धर्मशास्त्राच्या वर्गात बंद करून टाकतो (स्तोत्रसंहिता 19:5). एखाद्या गोष्टीचा उपयोग करायच्या आधी तिच्या अस्तित्वातच आनंद मानायला हवा. चेस्टरटन म्हणतो, गोष्टी “स्वतःसारख्या असतात” म्हणूनच त्यांच्यात प्रखर आनंद दडलेला असतो. आणि अशा आनंदांची गुपिते त्या लोभी राक्षसाला कधीही उमगणार नाहीत.

“देव आपल्या आनंदात सदैव, कृपापूर्वक आणि आश्चर्यकारकपणे उदार आहे.”

देव आपल्या आनंदात सदैव, कृपापूर्वक आणि आश्चर्यकारकपणे उदार आहे. दररोजचा सूर्योदय त्याची साक्ष देतो. आणि थॉमस ट्रेहर्न — जे लुईस यांच्या प्रमुख प्रेरणांपैकी एक होते — Centuries या ग्रंथात सांगतात की, आपल्याला अजूनही तितका आनंद प्राप्त झालेला नाही, जसा देवाने आपल्यासाठी अभिप्रेत केला आहे. हा विचारच त्या चिकटवट्या लोभी वृत्तीला, सतत अधिकाची मागणी करणाऱ्या असमाधानी मनाला, आणि देवाच्या उत्तम देणगींच्या व्यवहारवादी गैरवापराला एक प्रभावी प्रतिवाद ठरतो.

आत्मकेंद्रितपणा

लुईस यांच्या मते, वास्तवाकडे न वळणारे लक्ष हे देखील आपल्याला देवाच्या आनंदापासून विचलित करते. त्यांच्या मते, अशा प्रकारचे लक्ष आनंदाला विषय-आधारित बनवते. ते सूर्योदयासारख्या वस्तुनिष्ठ गोष्टीकडून आपले लक्ष वळवून, “आता माझ्यात (विषय) काय चालले आहे” याकडे नेते.

आपण सर्वांनी हा अनुभव घेतला आहे—जेव्हा एखादी भावना समजून घ्यायचा प्रयत्न करत आपण अंतर्मुख होतो, तेव्हा ती भावना आपल्या हातून निसटून जाते. हेच घडते, असे लुईस सूचित करतात, जेव्हा ख्रिस्ती आपल्या तारणाची खातरी शोधताना अडचणीत सापडतात. एक पवित्र जन जेव्हा आपल्या विश्वासाचा पुरावा शोधण्यासाठी स्वतःमध्ये डोकावतो, तेव्हा त्याला वाळूमध्ये निस्तेज पावलांचे ठसे दिसतात—कारण त्याची नजर विश्वासाच्या विषयाकडून दूर झाली असते. त्याने ख्रिस्ताकडे पाहणे थांबवलेले असते.

आनंद, विश्वासाप्रमाणेच, वस्तुनिष्ठ असतो. जेव्हा तुम्ही सूर्योदयाकडे पाहणे थांबवता आणि स्वतःला विचारता, मी खरोखर त्याचा आनंद घेत आहे का?”—तेव्हा तुम्ही सूर्योदयाचा सार आणि आनंद गमावता. अशा प्रकारे, आत्मकेंद्रितपणा, म्हणजे चुकीच्या प्रकारचे आत्मपरीक्षण— देवाच्या आनंदाला आतून पोकळ करून टाकतो. आत्म्याच्या या वक्रतेचा माग काढत गेल्यास, आपण थेट एदेनच्या बागेपर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्राचीन लोकांनी मनुष्याला “होमो इनकर्वेटस इन से” म्हणजेच “स्वतःकडे वाकलेला मनुष्य” असे नाव दिले.  मग आपण ह्या आत्मकेंद्रित वक्रतेतून मुक्त होऊन कसे सरळ होऊ?

शेवटी, आपल्या या वक्र आत्मकेंद्रितपणाला फाडून आपली दृष्टी देवावर खिळवण्याचे सामर्थ्य देवाच्या आत्म्यातच आहे. पण ट्रेहर्न अशा चमत्कृतीस कृतीरूप देण्याचा एक मार्ग सुचवतात: देवाच्या अद्भुततेत स्वतःचा मागमूसही उरू न देता हरवून जा. ते लिहितात, जेव्हा तुम्ही [देवाच्या जगात] प्रवेश करता, तेव्हा ते एका अमर्याद सौंदर्य आणि वैविध्याच्या प्रदेशासारखे असते, जिथे तुम्ही स्वतःला अद्भुत गोष्टींमध्ये हरवू शकता. पण स्वतःला अशा विस्मयात हरवून टाकणे  ही एक आनंद देणारी हानी आहे… आणि त्याच्या बदल्यात स्वतःऐवजी देवाला शोधणे—आपण त्याच्या भेटींमध्ये त्याला पाहतो, आणि त्याच्या तेजाची उपासना करतो” (पान क्र.9). बालसदृश्य विस्मयता ही अंतःकरणातून आत्मकेंद्रितपणाला खोडून टाकते, आणि आपल्याला देवाकडे मोहित करणाऱ्या दिव्य आनंदासाठी अंतःकरणात जागा निर्माण करतो.

परिचितपणाची सवय

शेवटी, लुईस बजावून सांगतात की दुर्लक्ष करणे हा देवाच्या आनंदांचा सर्वात मोठा शत्रू आहे—कारण कालांतराने आपण जे पाहतो, तेच पाहण्यात अपयशी ठरतो. एखाद्या जुना झालेल्या बंजी दोरासारखी आपली इंद्रिये शिथिल होतात— परिचितपणाच्या सवयीमुळे आपली दृष्टी कुंठित होते. एकेकाळी ज्या गोष्टी आपण बारकाईने आणि मनोभावे अनुभवत होतो, त्या लवकरच दालनाच्या भिंतीवरच्या चित्रासारख्या पार्श्वभूमीत लुप्त होतात. ट्रेहर्न सावध करतात, सर्वात सुंदर वस्तू नेहमी डोळ्यांपुढे असली, तरी ती परिचित झाल्यामुळे सामान्य वाटते आणि दुर्लक्षित होते… जर आपण तिला फक्त एकदाच पाहिले असते, तर ते पहिले दर्शन आपल्याला थक्क करून गेले असते. पण ती दररोज दिसते, म्हणून आपण तिला पाहतच नाही” (पान 65). आपल्या पतित अवस्थेत, मानवी संवेदनशीलतेचा प्रवाह नेहमीच या निष्काळजीपणाकडे वळतो.

मला हे पटवून देऊ द्या. आज तुम्ही एखाद्या झाडाजवळून गेलात का? तुम्ही ते पाहिले का? जर तुम्ही माझ्यासारखे असाल, तर कदाचित तुम्हाला त्याचे भानही आले नसेल. “पण त्रैक्य कल्पकतेचे हे किती अद्भुत कार्य आहे.  तारकांनी पोसलेला हा लाकडी मनोरा—उन्हाळ्यात एदेनच्या बागेतील खांब होतो, शरद ऋतूमध्ये आकाशाएवढे फुल उमलतो, हिवाळ्यात बर्फाच्या वस्त्रात एक पुतळा होतो, तर वसंत ऋतूमध्ये आशेचे जिवंत दिशासूचक चिन्ह ठरतो. झाडांशिवाय जगाची कल्पना करा! पण तरी आपण त्यांच्याकडे पाहतच नाही.

इथे काव्य रचनाकार आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. कारण सॅम्युअल टेलर कोलरिज स्पष्ट करतात की, “काव्य हे दररोजच्या गोष्टींना नाविन्यपणाचा मोहक झळाळ देण्यासाठी असते—सवयीच्या गुंगीला हलवून, आपल्या समोर उभ्या असलेल्या जगाचे सौंदर्य आणि त्याच्या अद्भुततेकडे लक्ष वेधण्यासाठी. मध्ये ते म्हणतात, हे जग म्हणजे एक न संपणारा खजिना आहे” (बायोग्राफिया लिटरारिया (Biographia Literaria, पान 208). काव्य, कदाचित सर्वात महत्त्वाचे, आपले लक्ष वेधून घेते आणि आपल्याला देवाच्या आनंदांचा सखोल आस्वाद घेण्यासाठी सज्ज करते.

स्तोत्रे हे कार्य अतिशय प्रभावीपणे करतात. हे परमेश्वर-प्रेरित कवी आपल्याला अशा दृश्यांचा साक्षात्कार घडवतात, अशा पुरुषांचा जे झाडांसारखे फळ देतात (स्तोत्र 1:3), सूर्याचा जो आकाशभर जणू हर्षोल्हासात विचरण करतो (स्तोत्र 19:5), चंद्र आणि विविध ताऱ्यांचा जे रात्री नभांगणात दरबार मांडतात (स्तोत्र 136:9), आकाशीय कोठारांत साठवलेल्या वाऱ्यांचे (स्तोत्र 135:7), आणि अर्थातच समुद्राचे —जो लिव्याथानसाठी एक असीम खेळाचे मैदान आहे (स्तोत्र 104:26). या तेजस्वी रंगमंचात आपण कधीही विस्मयतेच्या अभावामुळे  भुकेने व्याकुळ होणार नाही. जर आपली दृष्टी आत्म्याने उघडलेली आहे, तर आपण देवदूतांनाही थक्क करून टाकले असते. लुईस म्हणतात, खरा खटाटोप म्हणजे स्मरण करणे, लक्ष देणे. खरं तर, जागे होणे. आणि त्याहूनही अधिक, जागेच राहणे” (Letters to Malcolm, पान क्र.101).

देवामध्ये असलेला सर्व आनंद हा खरोखरच सर्वश्रेष्ठ आहे—त्या शब्दाच्या पूर्ण, समृद्ध, आणि ओथंबलेल्या अर्थाने. पण त्यासाठी श्रम आवश्यक आहेत. आनंद ही एक खरोखर कठीण शिस्त आहे. लोभ, आत्मकेंद्रितपणा, आणि दुर्लक्ष यांची न संपणारी ओढ ही सतत आपल्याला त्या ईश्वरीय आनंदांपासून तोडून टाकते. म्हणूनच ट्रेहर्न आपल्याला आवाहन करतात, “देवाच्या जगाचा आनंद घेण्यासाठी आपण आपल्या सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले पाहिजेत” (पान क्र. 63).


[1] किंवा विलासवाद, म्हणजे सुख हेच अंतिम उद्दिष्ट असा सिद्धांत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *