विश्वासाला उत्तेजन देण्यासाठी अतिशुद्धवाद्यांचे धडे
जेव्हा मी अतिशुद्धवाद्यांवर माझा डॉक्टरेटचा अभ्यास सुरू केला, तेव्हा मला माझ्या संशोधनाबद्दल सर्व प्रकारचे विचित्र आणि कधीकधी त्रासदायक प्रश्न प्राप्त झाले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट एका अनोळखी व्यक्तीकडून आली, ज्याने माझ्या पीएचडीचे उद्दिष्ट कळल्यावर विचारले, “अतिशुद्धवाद्यांनी वाढवलेल्या मुलांच्या काही कथा आपल्याकडे आहेत का? जे मोठे झाले आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्याशी जे गैरवर्तन केले त्यामुळे त्यांनी त्यांचा विश्वास सोडला?” प्रश्न अगदी शून्यातून आल्यासारखा वाटला; मला काय बोलावं सुचत नव्हतं. मला धक्का बसला आणि मी म्हणालो की मला अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीची माहिती नाही.
त्या रात्री नंतर माझ्या लक्षात आले की या प्रश्नाने मला का धक्का बसला. अशी कथा मी कधीच ऐकली नव्हती, पण त्या उलट दाखवणारे अनेक किस्से मी ऐकले होते — अतिशुद्धवादी वडिलांनी वाढवलेल्या तरुणांच्या अशा कथा जे नंतर स्वत: अतिशुद्धवादी बनले, जसे की अतिशुद्धवादी धर्मगुरू फिलिप हेन्री यांचा मुलगा मॅथ्यू हेन्री. लवकरच, मला असेही कळले की अतिशुद्धवादी स्पष्टपणे घरातील गैरवर्तनाविरूद्ध बोलत असत, पालकांना काळजी घेण्याच्या सूचना देत असत आणि विश्वास त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोचविण्यास बोध करत असत.
किंबहुना, अतिशुद्धवाद्यांना त्यांच्या कौटुंबिक जीवनातील निष्ठेसाठी अनेकदा स्मरणात ठेवले जाते. तथापि, अतिशुद्धवादी स्त्रियांबाबत आपण बरेचदा ऐकत नाही— विश्वासू माता, आजी, मावशी, बहीण आणि मुली ज्यांनी बरेच ओझे उचलले. जेव्हा मी अतिशुद्धवादी स्त्रियांचा अभ्यास सुरू केला, तेव्हा त्यांच्या कथांनी मला उत्तेजित केले : एक मुलगी तिच्या अविश्वासणार्या पित्याला सुवार्ता सांगते, एक मावशी आपल्या भाच्यांना प्रश्नोत्तरीद्वारे जीवनातील आव्हानांबाबत मार्गदर्शन करते, कौटुंबिक दुर्घटनेनंतर नातीचे संगोपन करणारी आजी. मंडळीच्या इतिहासातून आपल्यासाठी जतन केलेल्या या काही आश्चर्यकारक साक्षी आहेत.
पण माझ्याकरिता, एका अतिशुद्धवादी स्त्रीची विश्वास हस्तांतरित करण्याची सर्वात मनोरंजक कहाणी लुसी हचिन्सनच्या आयुष्यातून येते (1620–1681). कविता, इतिहास आणि ईश्वरविज्ञान या विषयांवर लेखन करणारी आठ मुलांची आई, सतराव्या शतकात एका स्त्रीने लिहिलेला एकमेव ज्ञात ईश्वरविज्ञानात्मक ग्रंथ हचिन्सनने तयार केला. त्याचा उद्देश? हा विश्वास तिची मुलगी बार्बराला हस्तांतरित करणे, जी लवकरच एक स्वतंत्र प्रौढ व्यक्ती म्हणून जीवन सुरू करण्यासाठी दूर जाणार होती.
जेव्हा प्रीती आणि कर्तव्य एकत्र येतात
हचिन्सनने ईश्वरविज्ञानाचे संपूर्ण पुस्तक लिहिले हे तिच्या संगोपनाचा विचार केल्यास कमी आश्चर्यकारक ठरते: तिला शिवणकाम आणि तिच्या वयाच्या मित्रांसोबत खेळणे आवडत नव्हते, तिला वाचनाची आवड होती आणि घरातील मोठ्यांचे बोलणे ऐकणे तिला आवडत असे, आईसोबत उपदेश ऐकण्यास ती हजेरी लावत असे, तिने लॅटिनमध्ये आपल्या भावाला मागे टाकले आणि शेवटी अशाच बौद्धिक आवडी असलेल्या माणसाशी तिने लग्न केले.
पण तरीही हचिन्सन आपल्या मुलीसाठी अख्खे पुस्तक लिहिण्याच्या त्रासाला सामोरी कशाला जाणार? बार्बरा यांना लिहिलेल्या पत्रात हचिन्सनने स्पष्टीकरण दिलेले आहे. जरी ती बार्बराला व्यावसायिक दृष्ट्या प्रशिक्षित ईश्वरविज्ञानकारांनी लिहिलेली एक परवडणारी प्रश्नोत्तरी विकत घेऊन देऊ शकली असती, (जसे की तिच्या स्वतःच्या लिखाणावर प्रभाव टाकणारे ईश्वरविज्ञानकार), तरी मुलीचा विश्वास स्थिर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आई म्हणून आपले कर्तव्य आहे अशी तिची खातरी होती — आणि ती हे कर्तव्य टाळू शकली नाही.
खरे आहे, बार्बराला हे सर्वोत्कृष्ट वाटले असेल. परंतु त्यापेक्षा अधिक म्हणजे, हचिन्सनला तिच्या लेखन प्रक्रियेदरम्यान मोठ्या वैयक्तिक आव्हानांचा सामना करावा लागला: आजारपण, विचलित होणे, बाह्य आधार आणि आत्मविश्वासाचा अभाव आणि पतीच्या मृत्यूनंतरचे परिणाम (ज्यामुळे तिचे मन तुटले, कर्ज फेडायचे होते आणि एकटीनेच काळजी घेण्यासाठी लेकरं होती). पण ही प्रक्रिया कितीही संथ आणि वेदनादायक असली तरी पुढे जायलाच हवं, असं तिला वाटत होतं. एकंदरीत, हचिन्सनला तिच्या मातृप्रेम आणि कर्तव्यभावनेव्यतिरिक्त प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे देव आणि त्याच्या लोकांप्रती तिचे स्वतःचे समर्पण होते.
विश्वासाने भरलेल्या माता प्रामाणिकपणे शिकवतात
हचिन्सनच्या ग्रंथात असे दिसून येते, जीवनाचे उद्दिष्ट देवावर प्रीती करणे आहे याची तिला पवित्र शास्त्रातून खातरी पटली, ज्यामुळे त्याच्या लोकांवर प्रीती केली गेली पाहिजे. म्हणून, तिने बार्बराला शिकवले की आपण “प्रीती” द्वारे सर्वात महत्त्वाची आज्ञा किंवा “नियम” पूर्ण करतो (मार्क 12:29–30; रोम. 13:10) आणि देव आपल्याला “प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष” देण्यास बोलावतो (इब्री 10:24), आणि प्रीतीद्वारे “प्रकाशात” राहण्यास बोलावतो (1 योहान 2:10).
या परिच्छेदांच्या प्रकाशात, तिने बार्बराला विनंती केली की तिने स्थानिक मंडळीमध्ये सामील होऊन विश्वासणार्यांसह देवाची उपासना करण्यामध्ये, एकमेकांची सेवा करण्यामध्ये आणि गरजूंची काळजी घेण्यामध्ये सहभागी व्हावे. खरं तर, तिचे पुस्तक देवावरील विश्वास, सृष्टी, तारण आणि पवित्रीकरणातील त्याचे कार्य आणि आपण त्याच्याशी आणि मानवतेशी कसे संबंधित राहतो याचे एक मोठे स्पष्टीकरण आहे.
दु:खाची बाब ही आहे की, हचिन्सनने बार्बराला हे विशेष पुस्तक पाठवल्यानंतर बार्बराचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही; बार्बराच्या मुलींना नंतरच्या आयुष्यात किती आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले याची एकच नोंद आमच्याकडे आहे. परंतु आम्हाला माहीत आहे की बार्बरा आणि तिच्या कुटुंबाला कितीही परीक्षांना सामोरे जावे लागले असले तरी लुसीने त्यांना दिलेल्या शिकवणुकीद्वारे त्यांना सर्वात महत्त्वाच्या सत्यांचे मार्गदर्शन मिळालेले होते.
आज विश्वास हस्तांतरित करणे
हचिन्सनच्या बौद्धिक कौशल्याबद्दल आणि महान महत्त्वाकांक्षेबद्दल जाणून घेतल्यानंतर, आपल्याला तिचे उदाहरण अनुकरण करण्यास खूप महान मानण्याचा मोह होऊ शकतो. पण तिच्या अनोख्या प्रतिभेव्यतिरिक्त हचिन्सनच्या कथेत आज आपण प्रभू येशूमध्ये आपली मुले, नातवंडे, पुतणी आणि पुतण्या वाढवण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्यासाठी अनेक धडे आहेत.
१. आधी स्वत:ला शिकवा.
सर्वप्रथम, हचिन्सनने आपल्या मुलीला शिकवण्यापूर्वी आणि शिकवताना स्वतःला पवित्रशास्त्रातील सत्यांवर रचले. तिने बार्बराला बोध केला तेव्हा ती एक अनोळखी, चेहरा नसलेली कथाकार म्हणून बोलली नाही — ती एक अशी ख्रिस्ती व्यक्ती म्हणून बोलली जिने आपले आयुष्य ईश्वरविज्ञानाचा अभ्यास करण्यात, मंडळीबरोबर जमण्यात आणि स्वतःच्या विश्वासाच्या प्रवासावर चिंतन करण्यात व्यतीत केले होते.
वैयक्तिक शिष्यत्वाबद्दलचे तिचे समर्पण आपल्याला शिकवते की जर आपल्याला आपल्या जीवनात अवलंबून असलेल्यांचे आणि शिष्यांचे कोणतेही आध्यात्मिक भले करायचे असेल तर प्रथम आपण ते आध्यात्मिक कल्याण स्वतःसाठी प्राप्त केले पाहिजे. पौल म्हणतो त्याप्रमाणे, “दुसर्याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय?” (रोम. 2:21). जर आपल्याला परूशी लोकांसारखे व्हायचे नसेल तर आपण इतरांना जे शिकवत आहोत त्यावर आम्ही विश्वास ठेवणे आणि ते आम्ही अनुभवणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या विश्वासात किंवा चांगल्या कार्यांमध्ये परिपूर्ण असण्याची आवश्यकता नाही, परंतु आपण काय विश्वास बाळगतो आणि का बाळगतो (काय शिकवतो ते सुद्धा!) याची आठवण करून देण्यामध्ये वेळ घालवणे आवश्यक आहे आणि नंतर वास्तविक आणि प्रभावी शिक्षण देण्यासाठी या सत्यांचे आपले वैयक्तिक अनुभव इतरांशी सामायिक करणे आवश्यक आहे.
2. सर्वोत्तम स्त्रोतांमधून प्राप्त करा.
तिच्या सर्व ईश्वरविज्ञानात्मक अभिरुचीसाठी, हचिन्सन व्यावसायिक ईश्वरविज्ञानकार नव्हती. त्या वेळचे कायदे आणि सामाजिक रूढी यामुळे ती विद्यापीठातही गेली नाही. तरीही, हचिन्सन ईश्वरविज्ञानात कुशल होऊ शकली कारण तिने जॉन कॅल्विन, जॉन ओवेन आणि वेस्टमिन्स्टर डिव्हाइन्सच्या लिखाणासह तिच्याकडे उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम ईश्वरविज्ञानात्मक संसाधनांना तिच्या वैयक्तिक पवित्र शास्त्र वाचनाशी जोडले.
आपल्याकडे योग्य साधने असतील तर हचिन्सनप्रमाणेच आपण सर्व जण चांगले शिष्य बनविणारे होऊ शकतो — आम्हाला अधिकृतपणे प्रशिक्षित होण्याची किंवा पगाराचे पैसे घेण्याची आवश्यकता नाही. जर आपल्याला “शिष्य बनविण्याची” महान आज्ञा पूर्ण करायची असेल आणि “[येशूने] आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टींचे पालन करण्यास” शिकवायचे असेल तर (मत्तय 28:19–20), देवाने इतरांना दिलेल्या शहाणपणाबरोबरच आपल्याला फक्त देवाने दिलेल्या क्षमतांचा वापर करण्याची गरज आहे (रोम. 12:6).
३. दु:खाद्वारे संकल्प दृढ होऊ द्या.
शेवटी, बार्बराला शिकवण्यासाठी हचिन्सनने अनेक संघर्ष केले. कदाचित इतिहासातील थोर विचारवंत सोफ्यावर बसून, हातात चहा आणि मांडीवर कुत्रा घेऊन बसून, आपले महाकाव्य लिहिताना आपण पाहतो. वास्तविकता मात्र अशी आहे की, हचिन्सनसह यातील अनेक विचारवंतांनी जागृत दु:स्वप्नांच्या मधोमध लेखन केले. तरीही अशा परीक्षांनी त्यांना विश्वास हस्तांतरित करण्यापासून रोखले नाही. खरं तर, बर्याच प्रकरणांमध्ये, दु:खाचा विपरीत परिणाम होऊन त्यांना तीव्रतेने आणि स्पष्टतेने सत्य कळविण्यास प्रवृत्त करण्यासाठी योग्य भावनिक वातावरण तयार झाले.
इतकं काही गमावल्यानंतर बार्बराचा विश्वास दृढ करणं हे हचिन्सनला आपलं कर्तव्य अधिक प्रकर्षाने जाणवले असावे. दु:खाने ती निराश झाली नाही; त्याऐवजी, तिच्यामध्ये आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी विश्वास हस्तांतरित करण्याकरिता सहनशीलता आणि चारित्र्य निर्माण झाले (रोम. 5:3–4).
आपणास सध्या स्वत:ला शिक्षणाकरिता झोकून देण्यासाठी चुकीची वेळ वाटू शकते. कदाचित तुमची मुले लहान असतील आणि तुम्ही तुमचे दिवस मोठ्या मुश्किलीने घालवत असाल. कदाचित कुटुंबातील एखादा सदस्य आजारी असेल. कदाचित आपल्या कुटुंबातील एखाद्याची नोकरी गेली असेल किंवा आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या परिस्थितीत असाल. काम करण्याची वेळ आणि विश्रांतीची वेळ असली, तरी आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे आपला विश्वास हस्तांतरित करण्याचे काम कायमचे दुर्लक्षित होता कामा नये. ख्रिस्ती प्रीतीच्या महानतेची स्वत:ला आठवण करून देणे आणि हचिन्सनच्या मातृप्रेमाचे उदाहरण आपणास जीवनातील ओझ्यांनी दबून गेल्यासारखे आणि कार्यासाठी अपात्र असे वाटत असतानाही आपला विश्वास हस्तांतरित करण्यास प्रवृत्त करू शकते. आपली परिस्थिती किंवा पात्रता काहीही असो, देव इतरांचा विश्वास बळकट करण्यासाठी आपला वापर करू शकतो, विशेषत: जेव्हा आपण त्याला आपले स्वतःचे सामर्थ्य बळकट करण्यास सांगतो.
लेख
जेनी लिन डी क्लेर्क