येणाऱ्या भावी जगाची कल्पना करणे
सामान्य जीवनाच्या तुलनेत आपण ह्या सृष्टीचा विचार — अरण्ये आणि महासागरे, चक्रीवादळे आणि भूकंप, सिंह, वाघ आणि अस्वले — नेहमी असा करतो की जणू ती रानटी आणि नियंत्रणाबाहेर आहे. आणि असा विचार चुकीचा नाही. परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये जेव्हा आदामाला ठेवले, ह्यापूर्वी की पापामुळे ह्या सृष्टीची नासधूस व्हावी, त्याने मनुष्याला “तिची मशागत व राखण” करण्याची आज्ञा दिली (उत्पत्ति २:१५). म्हणून मनुष्यजात ज्याप्रमाणे देवाचे प्रतिरूप प्रतिबिंबित करते, ह्याचा एक भाग म्हणजे ह्या पतित जगाला अर्थ देऊन त्यांत सुव्यवस्था आणणे होय.
तथापि, जवळून किंवा कदाचित निरखून पाहिल्यावर आपल्याला कळून येईल की ही सृष्टी जशी आपण सामान्यपणे कल्पना करतो तितकी रानटी नाही. पौल आपल्याला सांगतो की, पतन झाल्यामुळे, “सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली होती” आणि ती “नश्वरतेच्या दास्यामुळे” कण्हत आहे (रोम. ८:२०-२१). तिला कुंपण घातलेले नाही आणि तरीही सद्यस्थितीत ती दास्यात आहे. तिच्यावर नियंत्रण करता येत नसले तरीही ती बंधनात आहे. देवाने केलेली आश्चर्यकर्मे ही पापाने पडद्याआड करून दाबून टाकली आहेत. एवढेच नव्हे तर सर्वात खोल, सर्वात धोकादायक महासागरे देखील शापाने प्रभावित होऊन आणि दबले गेले आहेत. हेच नाही तर सर्वात बलवान, सुदृढ सिंह देखील ह्या न्यायामुळे क्षीण आणि आजारी झाले आहेत. प्रतिदिवशी होणारे अगदी तेजस्वी सूर्यास्त हे देखील ते येणाऱ्या समयात काय असतील ह्या वास्तविकतेपुढे छाया आहेत.
परमेश्वर लवकरच एक दिवस, आपल्याला माहित असलेल्या सर्व गोष्टी न चुकता नवीन बनवेल. तुम्ही आश्चर्यकारक अश्या एका चांगल्या भावी जगासाठी अत्यंत अभिलाषी आणि प्रार्थना करणारे म्हणून सुशिक्षित झाला आहात का?
देश ज्यात चांगलं असं काही नाही
आपल्यापैकी किती लोकांनी पूर्वस्थितीला पोहचलेली एक सृष्टी किती गौरवी असेल याचा — आणि सध्याच्या विनाशकारी स्थितीत असलेल्या सृष्टीचा विचार केला आहे? ज्यावेळेस देवाने जग निर्माण केले आणि सर्व काही चांगले आहे असे म्हटले, तेव्हा तो त्या जगाकडे पाहत नव्हता जे आज आपल्याला दिसत आहे. नाही, जेव्हा मानवजात गौरवातून पतन पावली तेव्हा महासागरे, पर्वते आणि तारे ही सर्व आपल्याबरोबर पतन पावली. पापाने सुंदर आणि निर्मळ असणाऱ्या पृथ्वीच्या सर्व खंडांना शापाच्या भयानक, क्लेशदायक आणि ओंगळ अशा दलदलीत ओढून नेले.
आदाम आणि हव्वेने जे त्यांना खाण्यासाठी वर्जित होते ते खाल्ल्यानंतर, त्याचे परिणाम दूरवर आणि खोलवर आणि व्यापक स्तरावर पसरले. “आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे” (उत्पत्ति ३:१७). मृत्यू आणि विनाश, दुखापत आणि रोग, भूकंप आणि चक्रीवादळे, द्वेष आणि विश्वासघात, दुष्काळे आणि पूर, कष्ट आणि त्रास! सृष्टीची प्रत्येक पातळी पापाने विकृत आणि डागाळली गेली आहे. हे जणू एक २५,००० मैल रुंदीचा ढग पृथ्वीवर पडला आणि शतके उलटल्यानंतरही तो वर गेला नाही असे आहे. जर देवाला सूर्य आणि तारकामंडळे, टेकड्या आणि महासागरे, झाडे आणि फुले, पक्षी आणि व्हेल मासे, सिंह, वाघ आणि अस्वले यांना पुन्हा पाहावे लागले तर तो यापुढे ह्यांना “चांगले” असे म्हणणार नाही, किमान जसे त्याने आरंभी म्हटले होते त्या प्रकारे तरी नाही.
ह्या गोष्टीवर विचार करा — देवाने काळजीपूर्वक (आणि सहजपणे) त्याच्या सृजनशीलतेचे आणि गुणवत्तेचे एक जिवंत, श्वास घेणारे भित्तिचित्र रंगवले आणि नंतर जे त्याने तयार केले होते त्याला पाहण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी तो थोडा मागे आला. ते दिसावयास अतिशय सुंदर होते. आणि यापूर्वी की पहिले मूल जन्माला आले, पापाने त्याच्या उत्कृष्ट कृतीला काळे फासले. त्याने आमच्यासाठी बांधलेल्या स्वप्नातील घराची पापाने तोडफोड केली आणि त्यास भूईसपाट केले. ते अतिशय उजाड झाले. आणि आजही आमचा हाच पत्ता आहे. म्हणून आपण आता जिथे काहीही “चांगले नाही” अश्या रस्त्यांवर आणि काना-कोपऱ्यांवर चालतो, काम करतो आणि खेळतो.
आम्ही एका हिंस्र आणि अंगावर शहारे आणणाऱ्या जगात राहतो ज्याला पापाने बंधक बनवले आहे – सध्या तरी. ही सृष्टी पाण्यात पडलेली आहे आणि बुडू नये म्हणून खूप हातपाय मारत आहे, श्वास घेण्यासाठी संघर्ष करत आहे, परंतु केवळ “सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या” वेळेपर्यंत (प्रेषित ३:२१).
जर धोंडे ओरडू शकतील तर
जेव्हा आपण त्या भावी जगाचा विचार करतो तेव्हा आपल्याला आपल्या नवीन, गौरवशाली शरीराच्या पैलूंची कल्पना करण्यास पुरेसा वेळ मिळू शकतो. चष्मा न लावलेले डोळे. न दुखणारे डोके. संधिवात नसलेले सांधे. ताठ न होणारी मान आणि पाठ. औषधे न खाता निरोगी रक्तदाब. कर्करोग नसलेले अवयव. ना झोपेचा त्रास. ना डॉक्टरची चिट्ठी. काय चूकले आहे हे शोधत बसण्याचा विचार करत बसावे लागणार नाही.
सृष्टी स्वतः “देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे” (रोम. ८:१९). जर धोंडे ओरडू शकतील तर, जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना देव काय बनवेल, पापातून बऱ्या झालेल्या पिढ्यांच्या आश्चर्यायाबद्दल, या सृष्टीच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात आपली पवित्रता प्रकाश आणि जीवन कसे प्रतिबिंबित करेल याबद्दल, ते ओरडतच राहतील. ह्या सृष्टीला मानवतेबद्दलचे एक रहस्य दिले गेले आहे की जे पुष्कळ लोकांना समजत नाही: आपण नेहमीच असे तुटलेले, असे थकलेले, असे प्रतिकूल, असे गोंधळलेले, भटकण्याची प्रवृत्ती असलेले राहणार नाही. तेजोमय देव लवकरच आपले गौरव करेल.
आणि सृष्टी केवळ आपण काय होऊ याचीच वाट पाहत नाही; तर पौल सांगतो की ती आपल्याला पाहण्याची उत्कट इच्छा बाळगते – त्यासाठी ती क्षितिजावर डोळे लावून आहेत, आपला श्वास रोखून आहे, सूर्याची एक झलक पाहण्याची वाट पाहत आहेत. का? कारण जेव्हा आपण आपल्या नवीन, अविनाशी, गौरवशाली अस्तित्वात येवू, तेव्हा, “…सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल.” (रोम. ८:२१). ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या गौरवासाठी नव्या स्वर्गांचे आणि नव्या पृथ्वीचे हे गौरव, आपले गौरव असेल.
अश्या प्रकारचे हे ठिकाण कसे असेल? केवळ आत्म्यांच्याच नव्हे तर या संपूर्ण विश्वाचेच पूर्वस्थितीला पोहचण्याचे साक्षीदार होणे हे काय असेल? आपल्यासाठी गौरवी मानवी शरीराच्या काही पैलूंची कल्पना करणे जितके सोपे आहे, तितके देवाने आपल्या सृष्टीला बरे करणे आणि नवीन करणे याची कल्पना करणे सोपे नाही – परंतु तो खात्रीने करेल.
ज्या वेळेस हे जग पापमुक्त होईल
क्षणभर कल्पना करा की, या जगाबद्दल तुम्हाला जे काही आवडते ते सरतेशेवटी नवे केले जाईल आणि देवाच्या गौरवाच्या नव्या आदेशाने चालवले जाईल.
नवा झालेला ओआहू चा किनारा किती गौरवशाली दिसेल? नेदरलँड्समधील ट्यूलिप्सच्या फुलांच्या अंतहीन मैदानांविषयी कल्पना करा? बुलबुल पक्ष्यांचे थवे किती मधुर आवाजात गायन करतील? किती नुकसान होईल याचा विचार न येता आपल्याला पाऊस आणि गडगडाट याचा नाद ऐकायला मिळेल का? दक्षिणी कॅलिफोर्नियातील एका संत्र्याला झाडावरून तोडून खाल्यावर त्याची चव कशी लागेल? ताजी स्ट्रॉबेरी खायला किती गोड लागेल? नेहमीपेक्षा अधिक गडद रंगाच्या आणि काटे विरहीत गुलाबाच्या बागांचा वास तुम्हाला यायला लागला आहे का? तुम्ही स्वतःला, सुंदर नद्यांमध्ये नौका विहार करतांना, सुंदर पायवाटांवर चालतांना, सुंदर रान-शेतातून सायकल चालवतांना, सुन्दर तलावांच्या बाजूला बसतांना, पाहू शकता का? हे स्वप्न ज्यात सर्व गोष्टी अनियंत्रित, अशक्य वाटतात, कधी थांबेल?
पवित्र शास्त्राव्यतिरिक, नव्या सृष्टीविषयीच्या माझ्या भूकेला जर कोणी सर्वात अधिक वाढवले असेल तर ते रँडी अल्कॉर्न आहेत. ते म्हणतात, “स्वर्गाला समजण्यासाठी — जे एक दिवस नव्या पृथ्वीच्या केंद्रस्थानी राहील — तुम्हाला ढगांकडे पाहण्याची गरज पडणार नाही; तुम्हाला फक्त तुमच्या चहूबाजूंना पाहून कल्पना करावी लागेल की हे जे सर्वकाही दिसते ते पाप आणि मृत्यू आणि दुःख आणि पतन याशिवाय कसे दिसेल” (हेवन, पृष्ठ १७, Heaven, 17). अशी कल्पना तुम्ही कधी करता का? ज्या वेळेस ह्या जगाला पापापासून मुक्त केले जाईल त्यावेळेस काही गोष्टी ह्या अति घातक असतील अशी कल्पना करण्यापेक्षा, ज्यावेळेस परमेश्वर त्याने रेखाटलेल्या चित्रावर पडलेला सर्व काळेपणा धुवून काढेल व त्यात नवीन जीवनाचा श्वास टाकेल तेव्हा हे जग खरोखर कसे असेल, याचा विचार करा.
आणि ह्या सर्व गोष्टींना प्रकाशात आणणारा तोच मनुष्य आहे, ज्याच्या हातावर खिळे ठोकले गेले, जो वधस्तंभावर मरण पावला आणि आता सिंहासनावर आरूढ आहे. ह्या सर्व गोष्टीच्या केंद्रस्थानी यहूदाचा सिंह राहील, त्याच्या गर्जनेचा आवाज सगळीकडे आणि सर्व प्राण्यांना ऐकू येईल, देवाचा कोकरू जो वधला गेला, हे सर्व शक्य आणि सुंदर करील. जॉन पायपर लिहितात,
आपण हे कधीही विसरणार नाही की, ह्या नवीन सृष्टीतील प्रत्येक दृश्य, प्रत्येक ध्वनी, प्रत्येक सुगंध, प्रत्येक स्पर्श आणि प्रत्येक चव, ख्रिस्ताने त्याच्या अयोग्य लोकांसाठी विकत घेतली आहेत. हे जग आणि त्यात असलेला सर्व आनंद यासाठी त्याला आपला प्राण द्यावा लागला आहे. अश्या प्रत्येक प्रकारच्या आनंदामुळे येशूबद्दल आपली कृतज्ञता आणि प्रेम उत्तरोत्तर वाढतच जाईल. (Providence, 687;प्रॉव्हिडन्स, पृष्ठ ६८७)
नव्या स्वर्गांकडे आत्ताच पाहणे
भविष्यातील तो दिवस जितका आश्चर्यकारक असेल, तितकाच देव परमेश्वर जे आपल्याबद्दल प्रकट करणार आहे, खरोखर सत्य राहील. लक्षपूर्वक ऐका: “कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे.” (रोम. ८:१९). त्या दिवशी आम्हाला पुत्र बनवले जाणार नाही; तर आपण सरतेशेवटी आपल्या पुत्रत्वाची परिपूर्णता पाहू. पौल ह्या वचनांच्या अगोदर लिहितो की, “कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्या योगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत. आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत…. (रोम ८:१४-१७)
देवाने विश्वासाद्वारे आपल्या अंतःकरणात जे आधीच करून ठेवले आहे त्याविषयी ही नवीन सृष्टी, आपल्या नवीन शरीरांसह, जगभरात शतकानुशतके प्रकट करत राहील. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, तर तुम्ही एक नवीन सृष्टी आहात – आत्ताच ह्या क्षणाला (२ करिंथ ५:१७).
प्रेषित योहानाने हीच वास्तविकता पाहिली :
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोतच. . . . प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. (१ योहान ३:१-२)
होय! क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा आपण बदलून जाऊ, आणि आपला जन्म परत-परत होणार नाही. जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत, तर नवा स्वर्ग आपल्यामध्ये आधीच वास्तव्यास आलेले आहे. आणि त्याचा आत्मा आपल्यामध्ये राहत असल्यामुळे, ज्या सर्व गोष्टी नव्या सृष्टीला इतक्या मन-वेधक आणि समाधान देणाऱ्या बनवतात, त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याच आहेत.
लेखक
मार्शल सेगल