येशूचे अनुसरण लहान लेकरांसह करणे

मी आणि माझे पती आम्ही दोघांनीही परदेशातील अशा लोकांमध्ये सेवा करण्यासाठी, ज्यांच्यापर्यंत अजूनही सुवार्ता पोहोचलेली नाही, देवाच्या ठरवलेल्या वेळेसाठी आणि योग्य संधीसाठी अनेक वर्षे प्रार्थना केली.

आम्ही अविवाहित असलेल्या काळात, देवाच्या अनेक अज्ञात कारणांमुळे त्याने यासाठी द्वार उघडले नव्हते. आणि विवाहाच्या प्रारंभीच्या वर्षांतही त्याच्याच अगम्य निर्णयांमुळे त्याने द्वार उघडले नाही. पण हे द्वार शेवटी तेव्हाच उघडले, जेव्हा मानवी दृष्टिकोनातून पाहता, गमावण्यास आमच्याकडे भरपूर काही होते —जसे की, एक घर, लहान मुले, त्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या अनोख्या संधी, एक रंजक व्यवसायात मिळालेले स्थैर्य व अनुकूलता, आणि कुटुंब म्हणून एक मंडळी जिच्यावर आम्ही प्रेम केले आणि आनंदाने तिची सेवा करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. अशाच वेळी देवाने आम्हाला जाण्यासाठी पाचारण दिले.

माझ्या पतीने त्या देशाला याआधी एकदा भेट दिली होती; परंतु ज्या ठिकाणी आम्ही जाणार होतो, त्या ठिकाणाबद्दल मला जवळजवळ काहीच ठाऊक नव्हते, फक्त एवढेच कळले होते की तेथे गरज मोठी आहे, आणि ती संस्कृती परदेशी लोकांविषयी संशय घेणारी व ख्रिस्ताविषयी वैरभाव धरणारी आहे. काही जिवलग व्यक्तींनी आमच्या निर्णयावर, आमच्या मूल्यांवर, आणि अगदी आमच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले—“तुम्हाला अशा धोकादायक स्थळी जावेच लागेल का? ? तुमचे कुटुंब हे नवखे असतानाही तुम्ही त्या देशी गेलेच पाहिजे का?

काहींनी तर मला एकांतात शोधून, माझ्यातील मातेच्या हृदयाला विनवणी केली—“मुलांना त्रास का देतेस? एवढे काही का सोडून देतेस?” खरंच, का? ह्याच प्रश्नांची आम्ही स्वतःला व देवाला प्रार्थनेत विचारणा केली—“पित्या, खरंच ह्याचसाठी तू आम्हाला पाचारण केले आहे का?” आणि जेव्हा आम्ही पवित्र शास्त्रात शोध घेत होतो व प्रार्थनेत संघर्ष करत होतो, तेव्हा आम्हाला असे जाणवले की देवच आम्हाला उलट विचारत आहे—“ माझ्यावर तुमचा विश्वास आहे का? जी किंमत मोजावी लागणार आहे, त्यापेक्षा मी अधिक मोलवान नाही का?”

माझ्यावर तू भरवसा ठेवशील का?

मी हायस्कूलमध्ये असताना माझ्या काकांनी माझ्या भावाला आणि मला एका देखण्या अल्पाइन पर्वतरांगेत पाठीवर सामान घेऊन गिरिभ्रमणसाठी नेले. परतीच्या वाटेवर, नकळत आम्ही एक अशी पायवाट धरली जिच्यात आम्हाला एक दरी ओलांडावी लागणार होती. पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बर्फ वितळून प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीवर पडलेल्या झाडाच्या खोडावरून जाणे. ते खोड अरुंद होते आणि त्याची मजबुती तपासलेली नव्हती. जर आम्ही खाली पडलो असतो, विशेषतः पाठीवर घट्ट बांधलेल्या जड बॅग्ससह, तर आमचे नाव स्थानिक मृत्युलेखात छापले गेले असते. पण आम्हाला फारशी भीती वाटली नाही. आम्ही ते आव्हान स्वीकारले आणि सावकाशपणे नदी ओलांडली.  

येशूचे अनुसरण करतानाही या जगातील दु:ख व हानी टाळता येतात, असे केवळ एक खोटी सुवार्ताच सांगते.”

मातृत्वामुळे त्या पडलेल्या झाडाविषयी माझा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आज कदाचित माझ्यावर अवलंबून असलेल्या लहान मुलांसह मी असा धोका पत्करला नसता (त्यांना कधीही तिकडे नेले नसते) — जोपर्यंत स्वतः देव आमच्याबरोबर जाण्याचे वचन देत नाही.

सुवार्तेच्या सेवेत धोके पत्करणे हे काही अंशी त्या झाडासारखेच असतात—जे वास्तविक धोक्यांवर लोंबकळलेले असतात, परंतु असले तरी ते धोकादायक ‘झाड’च आपल्या सध्याच्या ठिकाणाला खऱ्या आज्ञाधारकतेच्या ठिकाणाशी जोडणारा एकमेव मार्ग आहे. ख्रिस्ताशी जिचा समेट झालेला आहे आणि जिला “समेटाची सेवा” (2 करिंथ 5:18–19) सोपवलेली आहे अशी प्रत्येक आई कधी ना कधी भीती आणि सुवार्ता प्रसाराचे आज्ञापालन यांच्यातील तणाव अनुभवते.

हे देवा, मी त्या शहरात कशी राहायला जाऊ, जरी ते मंडळी स्थापनेसाठीच का असेना? माझ्या घराची दारे मला  पूर्णपणे अनोळखी असलेल्या लोकांसाठी मी कशी मोकळी  करू? माझ्या पतीने आणखी जास्त सेवा स्वीकारली तर जीवन किती कठीण होईल, हे तुला माहीत नाही का? जर मी माझ्या शेजारीणला सुवार्ता सांगितली आणि त्यानंतर ती माझ्याशी पुन्हा बोललीच नाही तर? पीडित, उपेक्षित आणि अनाथ लेकरांसाठी असलेली फॉस्टर-केअर[1] व्यवस्था किती गुंतागुंतीची आणि त्रासदायक आहे, हे तुला ठाऊक नाही का? मग आपण का त्या त्रस्त कुटुंबासोबत चालावे, आणि संकट आपल्या घरात आमंत्रित करावे?”

विश्वासी माता देखील कधी आपल्या कुटुंबांना सर्व जोखमींपासून सुरक्षित ठेऊ पाहतात; परंतु केवळ एक खोटी सुवार्ताच अशी उपदेश करते की, आपण येशूचे अनुसरण करूनही ह्या जगात दुःख आणि हानी टाळू शकतो.

संघर्षाच्या स्थितीत मातेची भूमिका

ख्रिस्ताचा आदेश हा आहे की त्याच्या शिष्यांनी (होय, अगदी मातांनी देखील) स्वतःचा नकार करावा आणि आपापला वधस्तंभ घेऊन चालावे (मत्तय 16:24). ज्यांना त्याच्या पुढील वचनांवर पूर्ण विश्वास आहे तेच त्याचे अनुसरण करण्याचे धाडस करतील: “कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल.” (मत्तय 16:25). आज्ञापालनामुळे क्षणिक हानी जरी झाली, तरी त्याने म्हटल्याप्रमाणे तिचा शेवट जीवन आणि लाभ हाच असेल, यावर आपण विश्वास ठेवतो का?

धोके पत्करत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा नाही की आपण काय गमावू शकतो, तर हा आहे की आपण कोणावर विश्वास ठेवतो. आणि “तू आमचा पिता आहेस…आमचा त्राता…प्राचीन काळापासून” (यशया 63:16) ह्याच्यापेक्षा आपल्या विश्वासाचा दुसरा उत्तम—किंवा दुसरा कोणताही—आधार नाही. तो चांगला आहे आणि जे चांगले आहे तेच तो करतो (स्तोत्र 119:68). त्याच्याकडे ज्ञान, सामर्थ्य, युक्ती आणि समज आहे (इयोब 12:13). तो पदरात टाकलेल्या चीठ्यांचा निकाल आणि राजाच्या मनाचा कल आपल्या हातात धरतो (नीतिसूत्रे 16:33; 21:1). 

“आज्ञापालनामुळे क्षणिक हानी जरी झाली, तरी त्याने म्हटल्याप्रमाणे तिचा शेवट जीवन आणि लाभ हाच असेल, यावर आपण विश्वास ठेवतो का?”

आणि जी स्त्री देवावर आशा ठेऊन राहते, ती घाबरून तळघरात जाऊन आपल्या मुलांचे संरक्षण करत बसणार नाही. ती अस्त्र-शस्त्र धारण करून रणांगणावर उभी राहील आणि धोक्याच्या समयी म्हणेल, “ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय?” (रोमकरांस 8:35). ती एखाद्या वृक्षाच्छादित उपनगरात वास्तव्यास असो, काँक्रीटच्या शहरात असो कि परदेशात असो, ती आपल्या मुलांना ख्रिस्ताची सेवा करण्याच्या जोखमींपासून पळ काढायला शिकवणार नाही, तर त्याऐवजी ती, “मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन” (स्तोत्र 56:3) अशी प्रार्थना करायला शिकवेल.

माझ्यासाठी तुम्ही सर्व धोके पत्करू शकता का?

आमच्या पुढील वाटचालीपूर्वी, मी देवाचे मोल आणि त्याच अनुषंगाने त्याच्या सुवार्तेच्या संदेशाचे व मंडळीचे मोल दृढनिश्चयाने मान्य केले होते. मी थरथरत होते, पण मी कबूल केले की आम्ही जे सर्व प्रकारचे धोके पत्करणार होतो यांपेक्षा तो अधिक मौल्यवान आहे.

एक वर्ष उलटण्याआधीच, जस-जसे परदेशी संस्कृतीच्या जीवनातील खरे ताण उफाळून येऊ लागले होते,  (आणि ज्या वेळी मला आशा होती की आमच्या आयुष्यातील सर्वात आजारी गेलेले वर्ष आता संपणारच आहे), अगदी त्याच वळणावर मी माझ्या कुटुंबाला पुन्हा गंभीर आजारांच्या विळख्यात पडलेले पाहिले. मी स्वतःला पुन्हा आपत्कालीन कक्षात पाहिले—माझ्या सर्वात लहान मुलीला उराशी धरून—पण तिच्या आजाराबद्दल कुठलेही उत्तर मिळाले नाही. डॉक्टर मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की तिच्या मूत्रपिंडात कदाचित काही विकार असू शकतो, आणि तत्क्षणी माझे लक्ष देवाच्या मोलावरून विचलित झाले.

पौलाने 2 करिंथ 11:23–27 मध्ये ख्रिस्ताचा सेवक ह्या नात्याने जे काही भोगले त्याचे वर्णन केले आहे: श्रम, तुरुंगवास, शारीरिक दुखापत, मूलभूत गरजांपासून वंचित राहणे तसेच लोक आणि प्रकृती या दोघांकडून येणारे धोके. तसेच तो फिलिप्पैकरांस 3:3–6 मध्ये आणखी तपशीलवार सांगतो की त्याने ख्रिस्तासाठी काय गमावले—जन्मसिद्ध हक्क, वंशावळ, ओळख, शिक्षण, कर्तृत्व, आणि मनुष्यांची प्रशंसा. आणि शेवटी तो असा निष्कर्ष देतो“इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा” (फिलिप्पैकरांस 3:8). जरी पवित्र आत्म्याने त्याच्या विषयी अशी साक्ष दिली होती की प्रत्येक शहरात “कारावास आणि संकटे” ही त्याची वाट पाहत आहेत, त्याने घोषणा केली, “मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.” (प्रेषित 20:24). ख्रिस्ताच्या श्रेष्ठत्वात ह्या प्रेषिताला इतके मोल दिसले की त्याच्या तुलनेत त्याचे स्वतःचे जीवनही निरर्थक मानले होते. 

धोका पत्करणारा तुमचा पुढील होकार

पौलाने त्याच्या सेवेच्या कारकिर्दीत जे जे निर्णय घेतलें त्यांना आपण केवळ ह्यामुळे की तो एक प्रेषित (आणि कोणावरही अवलंबून नसलेला अविवाहित मनुष्य) होता, कमी व्यावहारिक किंवा सोयीस्कर असे म्हणून नाकारू शकत नाही. ख्रिस्ताविषयीचे पौलाचे मूल्यमापन त्याच्या जीवनस्थिती आणि पाचारणाच्या क्षेत्राच्या पलीकडे गेले होते.

रुग्णालयात माझ्या लेकीला कवेत धरून मी फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींकडे पाहत होते आणि “आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे,” (इब्री 12:2) ह्यापासून माझी दृष्टी ही बहकून गेली होती. मला प्रार्थना करावी लागली—आणि इतरांना देखील ह्याकरिता प्रार्थना करण्यास सांगावे लागले—की देवाने माझे अंतश्‍चक्षू प्रकाशित करावे (इफिसकरांस 1:18), जेणेकरून मी, “जो अदृश्य आहे त्याला पाहत” धीर धरू शकेन (इब्री 11:27).

तर मग आपण जे धोके पत्करतो त्यांच्या तुलनेत ख्रिस्ताचे मोल हे किती आहे? कारण ही तात्कालिक व हलकी क्लेशकारक संकटे आमच्यासाठी सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीत आहेत, जो सर्व प्रकारच्या तुलनेपलीकडे आहे (2 करिंथ 4:17). ही नुसती नाणी आहेत जी ख्रिस्ताच्या अगम्य संपत्ती द्वारे गिळंकृत केली गेली जातात (इफिसकरांस 3:8).

माझ्या सोबतीच्या मातांनो, मी जरी सात समुद्रांपलीकडे असली तरी आमच्यापैकी कोणीही आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण हे आपले नागरिकत्व असलेल्या देशासाठी करत नाही. ख्रिस्ताची सेवा करत असताना तुम्हालाही अनेक जोखमींचा सामना करावा लागतो. तुमचा विश्वास हा त्याच्यावर आहे का? तो ह्या सर्व परिस्थितींपेक्षाही बहुमुल्य आहे का? तसे असल्यास, आज त्याच्यासाठी तुम्ही कोणता विश्वासू आणि धोका पत्करणारा होकार देऊ शकता?


[1] फॉस्टर-केअर व्यवस्था’ ही एक सामाजिक सेवा-रचना आहे, प्रामुख्याने अमेरिकेसारख्या देशांत प्रचलित. ज्या मुलांना छळ, दुर्लक्ष, परित्यक्तपणा किंवा इतर संकटांमुळे आपल्या जन्मदात्या पालकांबरोबर सुरक्षितपणे राहता येत नाही, अशा मुलांना तात्पुरत्या काळासाठी दुसऱ्या कुटुंबाच्या देखरेखीखाली ठेवले जाते; त्या कुटुंबाला ‘फॉस्टर पालक’ म्हटले जाते.

लेखक

टी. किम

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *