रक्तसाक्षींनी सुरुवातीची मंडळी कशी बांधली
इ.स. 64 मध्ये रोमचा बराचसा भाग उद्ध्वस्त करणारी आग सुरू केल्याबद्दल सम्राट नीरोने ख्रिस्ती लोकांना दोष दिला, तेव्हा छळ हे प्रथमच अधिकृत धोरण बनले. जरी ते तुरळक राहिले, परंतु सुरुवातीच्या बर्याच ख्रिस्ती लोकांना त्यांच्या विश्वासाची अंतिम किंमत कधी मोजावी लागेल हे माहीत नव्हते.
अशा ख्रिस्ती लोकांना तत्कालीन प्रेक्षागृहांमध्ये सिंहांना तोंड देत किंवा त्यांच्या कार्यास्तव जिवंत जाळल्याची छायाचित्रे आपल्यापैकी बर्याच जणांना परिचित आहेत. ज्यांनी अशा प्रकारे आपले प्राण गमावले त्यांना रक्तसाक्षी म्हणून सन्मान दिला जातो, हा शब्द मुळात साक्षी असा होता परंतु आता तो त्यांच्या विश्वासाकरिता मरण पावलेल्यांसाठी राखीव आहे. सुरुवातीच्या रक्तसाक्षींविषयी सांगितलेल्या काही कथा अतिशयोक्तीपूर्ण आहेत. (उदाहरणार्थ, डायनिसियसला पॅरिसमध्ये ठार मारण्यात आले पण कापलेले डोके घेऊन तो दहा मैल चालत होता, असल्या आख्यायिकेवर आपण विश्वास ठेवण्याची गरज नाही.)
असे असले तरी, ख्रिस्ताची भक्ती सोडण्यास नकार दिल्याने असे बरेच लोक त्यांच्या मृत्यूस सामोरे गेले होते. असे का होते? चर्च फादर टर्टुलियन (The church father Tertullian c. 155–c. 220) सुरुवातीच्या ख्रिस्ती बलिदानावर आणि देवाने त्याची मंडळी बांधण्यासाठी त्याचा कसा वापर केला ह्यावर प्रकाश टाकतात.
येशूचे अनन्य मरण
एखाद्याला त्याच्या विश्वासासाठी ठार मारले जाऊ शकते ही कल्पना प्राचीन जगात पूर्णपणे अज्ञात नव्हती, परंतु असे मृत्यू असामान्य होते आणि सामान्यत: नाकारले जात होते. सॉक्रेटिस या एथेनियन तत्त्ववेत्त्याचे एक उत्कृष्ठ उदाहरण आहे ज्याला इ.स.पू. 399 मध्ये त्याच्या सहकारी नागरिकांनी फाशी दिली कारण त्यांना वाटले की तो नास्तिक असून तरुणांची दिशाभूल करीत आहे. त्या अन्यायामुळे झालेला घोटाळा इतका मोठा होता की, अथेन्समध्ये पुन्हा असे काही घडले नाही.
काहींनी येशूची तुलना सॉक्रेटिसशी केली असली तरी सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांनी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले. त्यांना माहीत होते की येशूचा छळ झाला कारण यहूदी पुढाऱ्यांनी त्याच्यावर देवाविरुद्ध दुर्भाषणाचा आरोप केला होता आणि पॅलेस्टाईनमधील रोमन अधिकारी फाशीच्या शिक्षेच्या मागणीला विरोध करण्यास फार भ्याले. येशू निव्वळ तत्त्ववेत्ता नव्हता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी बळी म्हणून त्याचा मृत्यू झाला नाही. त्याचा मृत्यू हे एक असे बलिदान होते जे देवाने यहूद्यांना दिलेल्या अभिवचनाची पूर्तता म्हणून पूर्वनिर्धारित केलेले होते की तो त्यांना त्यांच्या पापांपासून वाचवेल. निरपराध रक्त सांडल्याबद्दल त्याची निंदा करणारी माणसे नक्कीच दोषी होती, पण त्यांना न समजलेल्या दैवी योजनेचे ते नकळत हस्तकही होते (प्रेषित 4:24–28).
येशू आमच्या पापांची किंमत मोजण्यासाठी मरण पावला, परंतु तो कबरीत राहिला नाही. तीन दिवसांनी तो पुन्हा मृतातून उठला – आणि त्यानंतर चाळीस दिवसांनी तो स्वर्गात गेला. तो मानवी अन्यायाला बळी पडला, परंतु नंतरच्या घटनांनी त्याला जगाचा तारणहार म्हणून प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्या तारणाची घोषणा केली.
ख्रिस्ती रक्तसाक्षी
विशेषत: यहूदी प्रस्थापितांमध्ये येशूचे शिष्य अप्रिय होते, त्यांना असे वाटत होते की जुन्या करारातील बलिदान आता वैध नाही असा दावा करून ते यहूदी धर्माचा नाश करीत आहेत. सुरुवातीच्या अनेक ख्रिस्ती लोकांना अटक करण्यात आली आणि त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली (प्रेषित 7:58–60; 12:1–2). जरी या घटना दुर्मिळ होत्या, तरी काहींना त्यांच्या यहूदी छळणार्यांकडून आपला जीवही गमवावा लागला. आणि मग, रोमला आग लागल्यानंतर, छळ हा शाही धोरणाचा विषय बनला.
गंमत म्हणजे, ख्रिस्ती लोक किंवा त्यांचा छळ करणारे त्यांचे अपराध काय आहेत हे स्पष्ट करू शकले नाहीत. ख्रिस्ती लोक सामान्यत: रोमन साम्राज्याअंतर्गत आदर्श प्रजा होते आणि मूर्तींची उपासना करण्यास नकार देण्यापलीकडे कोणालाही नाराज करण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही. रोमनलोकांनी अर्थातच त्यास नकार दिला, पण यहूदीही मूर्तिपूजा करत नव्हते, तसेच सर्व धर्मांना अंधश्रद्धा मानणारे अनेक तत्त्ववेत्तेही मूर्तिपूजा करत नव्हते आणि त्यांना मात्र ठार मारण्याचा कोणी प्रयत्न केला नाही.
सुशिक्षित ख्रिस्ती लोकांनी आपल्या विश्वासाच्या बचावात लिखाण करण्यास संकोच केला नाही ज्यात त्यांनी मूर्तिपूजकांनी त्यांचा छळ करणे किती चुकीचे आहे याकडे लक्ष वेधले. त्यांपैकी एक ख्रिस्तीत्व स्वीकारणारा उत्तर आफ्रिकन टर्टुलियन होता. फाशीपासून बचावलेल्या टर्टुलियनने अनेक पुस्तके लिहिली ज्यात त्याने आपला विश्वास अविश्वासणार्या लोकांना समजावून सांगितला आणि रक्तसाक्षींना ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून त्यांच्या बलिदानाबद्दलही ते जे मानतात ते सत्य असल्याचा पुरावा म्हणून खंबीरपणे उभे राहण्यास प्रोत्साहित केले.
टर्टुलियनची साक्ष
टर्टुलियन हा पहिला ख्रिस्ती होता ज्याने विशेषतः रक्तसाक्षी आणि छळाबद्दल लिहिले होते, जरी त्याने स्वत: या दोन्हीपैकी एकही यातना भोगल्याची चिन्हे नाहीत तरी. स्वत: रक्तसाक्षी होत असलेल्या किंवा छळापासून पळून जाण्याचा आणि आपला जीव वाचवण्याचा मोह झालेल्या इतर ख्रिस्ती लोकांना त्याने काही छोटी पुस्तके लिहिली. टू दी मार्टीयर्स अँड ऑन फ्लाईट इन पर्सिक्युशन To the Martyrs and On Flight in Persecution, ह्यामध्ये त्याने त्यांना जिवापेक्षा अधिक प्रिय असलेल्या आध्यात्मिक सत्यासाठी खंबीरपणे उभे राहण्यास आणि बलिदान देण्यास सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे, येशू त्यांच्यासाठी मरण पावला होता, म्हणून त्याच्यासाठी मरता येणे ही एक सन्मानाची गोष्ट होती. ख्रिस्ती लोक गंभीर आहेत हे अविश्वासणार्यांसाठी एक खूण होती. ज्याप्रमाणे येशू मृतातून परत आला, त्याचप्रमाणे ते स्वर्गात त्याच्याबरोबर पुन्हा उच्च जीवनाकरिता उठतील.
तथापि, टर्टुलियनने या विषयाची सर्वात महत्वाची चिकित्सा त्याच्या माफीनाम्यात केली होती, तो ख्रिस्ती लोकांना ठार मारणार्या मूर्तिपूजकांना उद्देशून एक दीर्घ युक्तिवाद होता. भूकंप आणि पूर निर्माण करण्यासाठी अनेक मूर्तिपूजक ख्रिस्ती लोकानां दोष देत होते, हा एक विचित्र आरोप होता ज्याचे खंडन करणे सोपे होते. ख्रिस्ताच्या आगमनाच्या खूप आधीपासून नैसर्गिक आपत्ती येत होत्या, मग त्याचे अनुयायी त्यास कसे जबाबदार असू शकतात? याउलट ख्रिस्ती लोकांनी सर्व लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आणि जेव्हा आपत्ती आली, तेव्हा त्यांनीच पीडितांना मदत केली, मूर्तिपूजकांनी नाही.
“रक्तसाक्षींच्या साक्षीला फळ आले, जे पाहण्यासाठी ते जिवंत राहिले नाहीत.”
शिवाय, ज्या लोकांनी ख्रिस्ती लोकांना प्रार्थना करत आणि गात त्यांच्या मृत्यूला तोंड देताना पाहिले, तेव्हा त्यांच्या धाडसाने ते भारावून गेले आणि त्यांच्या विश्वासांची अधिक काळजीपूर्वक तपासणी करण्याचा त्यास मोह झाला, जे अत्याचार करणार्यांना हव्या असलेल्या गोष्टींच्या अगदी उलट होते. किंबहुना, अनेकदा रक्तसाक्षींच्या साक्षीनेच इतरांना ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त केले. जग त्यांच्या विरोधात होते, पण ख्रिस्ती लोकांना घाबरण्याचे कारण नव्हते आणि त्यासाठी मरण्याची तयारी दाखवून त्यांनी आपला विश्वास दाखवून दिला.
‘मी आपली मंडळी रचीन’
आपल्या सहविश्वासू बांधवांवर झालेल्या अन्यायामुळे टर्टुलियन दु:खी झाला होता, परंतु छळाच्या भयानकतेच्या पलीकडे त्यामागे असलेल्या देवाच्या हेतूंकडे तो पाहू शकला. त्याने आपल्या मूर्तिपूजक समकालीनांना समजावून सांगितले की जितका ते ख्रिस्ती लोकांचा जास्त छळ करतील, तितके त्यांचे रक्त त्यांच्या विश्वासाच्या सत्यतेची साक्ष देईल. आधुनिक लेखकांनी त्यांच्या शब्दांचा अर्थ लावला आहे, “रक्तसाक्षींचे रक्त हे मंडळीचे बीज आहे.”
जे घडतंय ते पाहणारे अनेक लोक त्यांनी पाहिलेल्या गैरकृत्यांबद्दल उदासीन नव्हते. जे रक्तसाक्षी स्वेच्छेने मरण पावले ते अनेकदा आनंदाने गीते गात होते, ते त्यांनी ऐकलेल्या ख्रिस्ती प्रचारकांपेक्षाही अधिक शक्तिशाली संदेश उपस्थितांना देत होते. विश्वासणार्यांच्या असे वागण्यामुळे अनेकांना वाटले की या विश्वासामध्ये काहीतरी असलेच पाहिजे. अनाकलनीयरीत्या आणि हळूहळू मंडळी वाढू लागली. एक-एक करून शत्रुत्व बाळगणारे किंवा उदासीन असणारे लोक प्रश्न विचारू लागले आणि जसजशी उत्तरे मिळत गेली, तसतसे ते जे पाहत होते आणि त्यांना जे सांगितले जात होते त्यातील सत्यतेची खातरी त्यांना पटत गेली.
“जुन्या काळातील रक्तसाक्षींप्रमाणे आपणही हे जाणून विश्वासाने चालतो की या जगात मृत्यू हे केवळ अनंतकालिक जीवनाचे प्रवेशद्वार आहे.”
शहराच्या शत्रूंविरुद्ध उभे राहून त्याला विनाशापासून वाचविणाऱ्या सुरुवातीच्या रोमच्या महान नायकांची आठवण वाचकांना करून देण्यास टर्टुलियन मागेपुढे पाहत नव्हता. अनेक शतकांनंतर त्यांच्या समर्पणामुळे जगभर साम्राज्य निर्माण झाले होते. ही मंडळी एक दिवस एवढी जागतिक व्याप्ती प्राप्त करेल, याची त्याला खातरी होती. ते पाहण्यासाठी तो जिवंत नसला तरी तो चूक नव्हता. दु:ख आणि बलिदान ख्रिस्ती लोकांनी मागितले नव्हते, परंतु देवाने अशा छळाचा उपयोग आपली मंडळी बांधण्यासाठी केला. रक्तसाक्षींच्या साक्षीला फळ आले, जे पाहण्यासाठी ते जिवंत राहिले नाहीत. आज ख्रिस्ती म्हणून, आपण स्वाभाविकपणे आपल्या विश्वासासाठी त्यांच्यापेक्षा जास्त दु:ख सहन करू इच्छित नाही, परंतु त्यांच्या उदाहरणावरून आपण पाहू शकतो की आपल्या दु:खांचा देवाच्या मनात एक हेतू आहे. जो त्याच्या चांगल्या वेळी, त्याच्या पवित्र नावाचा सन्मान आणि महिमा करण्याकरिता प्रकट होईल. जुन्या काळातील रक्तसाक्षींप्रमाणे आपणही हे जाणून विश्वासाने चालतो की या जगात मृत्यू हे केवळ अनंतकालिक जीवनाचे प्रवेशद्वार आहे.
लेखक
गेराल्ड ब्रे