धैर्याने सहन केलेल्या दुःखाचे प्रतिफळ
मला माझ्या मित्रांकडे पाहून आणि ते वाट पाहत असलेल्या आशेकडे पाहून अतिशय क्षीण झाल्यासारखे वाटते.
माझ्या काही मित्रांना असह्य आणि दीर्घकालीन वेदना आहेत, ज्यामुळे त्यांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. इतर काही जण कुटुंबातील अत्यंत गुंतागुंतीच्या जबाबदाऱ्यांमध्ये पूर्णपणे झोकून देत असून, त्यांना थकवा आणि निराशा जाणवत आहे, आणि त्या परिस्थितीचा शेवट काही दिसत नाही. तर आणखी काहींचे जीवन निराशा, तुटलेल्या स्वप्नांमुळे आणि वाढत्या अपूर्ण इच्छा-आकांक्षांनी व्यापलेले आहे.
मी हे सगळे पाहत असताना आणि त्यांच्यासाठी प्रार्थना व शोक व्यक्त करत असताना, मला हे जाणून घ्यायचे आहे की, स्वर्गात अशा लोकांसाठी काही विशेष प्रतिफळ असेल का, जे दुःखामध्येही स्थिर राहतात? जे लोक आपला तोटा आणि रिक्तपणा स्वीकारून, देवात परिपूर्णता शोधतात, त्यांना काही भरपाई मिळेल का? जे लोक, शारीरिक किंवा मानसिक वेदना सोसताना, देवाच्या कृपेवर अवलंबून राहतात, त्यांना काही विशेष पुरस्कार मिळेल का?
स्वर्गातील बक्षिसे?
जेव्हा मी प्रथम “स्वर्गातील बक्षिसे” या कल्पनेबद्दल ऐकले, तेव्हा मला असे वाटले की ती कृपेच्या तत्त्वज्ञानाशी विसंगत आहे. पण नंतर मी पाहिले की पवित्र शास्त्रात स्वर्गातील वेगवेगळ्या बक्षिसांचा उल्लेख आहे — आणि ती सर्व देवाच्या कृपेच्या आमच्यातील कार्याला प्रतिसाद म्हणून दिली जातात.
पवित्र शास्त्रात उल्लेख केलेल्या अनेक बक्षिसांपैकी काही बक्षिसे आपण बांधलेल्या पायाभूत रचनेवर आणि केलेल्या कार्यावर आधारित असतील (1 करिंथ 3:11–15), तर काही आपल्याला सहन केलेल्या दुःखांमधील चिकाटीसाठी मिळतील, ज्यामुळे आपल्या भविष्याच्या गौरवासाठी अतुलनीय वैभवाची निर्मिती होईल. 2 करिंथ 4:16–17 आपल्याला आठवण करून देते, “म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे; कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते.
पौलाने आपले दुःख सहन करताना कधीही थकवा जाणवू दिला नाही किंवा धीर सोडला नाही, कारण देव त्याला दररोज नव्याने ताजेतवाने करत होता आणि येणाऱ्या गौरवाची खात्री देत होता. पौल दुःख समजू शकत होता: त्याला निर्दयपणे मारहाण झाली, चाबकाने फटके मारले गेले, त्याच्यावर दगडफेक झाली; तो काही काळ उपासमारीच्या स्थितीत होता; आणि तो सतत मंडळीसाठी चिंताग्रस्त असे (2 करिंथ 11:23–29). तरीसुद्धा, त्याला माहित होते की त्याच्या वेदनांमागे एक उद्देश होता.
2 करिंथ 4:17 मध्ये “भार उत्पन्न करते” या शब्दासाठी वापरले गेलेले ग्रीक शब्द काटेरगाझोमाई (katergazomai) याचा अर्थ “निर्माण करणे, साध्य करणे, किंवा प्राप्त करणे” असा होतो. पौलाला माहीत होते की दुःख भविष्यात काहीतरी विलक्षण निर्माण करेल किंवा साध्य करेल. दुःख केवळ चिकाटी आणि चारित्र्य विकसित करत नाही, तर ते ख्रिस्तावर अवलंबून राहायला शिकवते, इतरांना सांत्वन करण्यास सक्षम करते, आणि पृथ्वीवर आपल्या विश्वासाला परिष्कृत करते; ते येणाऱ्या अधिक गौरवाचे कारण बनते.
दररोजच्या समर्पणांमध्ये देवाचे सामर्थ्य
ही आशा केवळ पौलाच्या असामान्य दुःखांसाठीच लागू होत नाही, तर ती प्रत्येक दुःखासाठी आहे, जी आपण देवाकडे समर्पित करतो. जेव्हा आपण आपल्या वेदनांमध्ये देवाकडे वळतो, जगाकडे नव्हे; जेव्हा आपण देवाला दोष देण्याऐवजी त्याची स्तुती करतो; जेव्हा आपण त्याच्या प्रेमावर शंका घेण्याऐवजी त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपण स्वर्गातील प्रतिफळ साठवतो. हे आपल्याला आज ख्रिस्ताच्या जवळ आणते आणि भविष्यात अधिक गौरवाचा भाग बनते. जॉन पायपर म्हणतात:
आपल्या सर्व अडचणी — त्या छोट्या असोत किंवा भीषण — एका श्रेणीत येतात. . . . मग ती औपचारिक नृत्याच्या रात्री चेहऱ्यावर आलेली लहानशी मुरुम असो किंवा मुलाला गमावल्याचा भयानक धक्का असो. . . . कोणतीही अडचण, अगदी सर्वात छोट्या त्रासापासून ते सर्वात भीषण दुःखापर्यंत … यात सार्वकालिक गौरवाच्या भारासाठी कार्य करण्याची क्षमता असते. कारण मुख्य मुद्दा असा आहे: या अडचणींमुळे आपण देवाकडे मदतीसाठी, खजिन्यासाठी आणि आनंदासाठी वळतो का?
जेव्हा मला प्रत्येक तोटा स्वीकारून तो देवाकडे समर्पित करण्याचे महत्त्व कळले, तेव्हा मी जोनी एरेक्सन टाडा ह्यांच्याशी झालेल्या संभाषणात जाणवले. आम्ही जेवत होतो आणि माझ्या लक्षात आले की त्यांना अपेक्षेप्रमाणे अन्नाचा प्रत्येक घास घेता येत नव्हता किंवा हव्या त्या तापमानाची कॉफी मिळत नव्हती. मी हे सहजतेने बोलून दाखवल्यावर जोनी म्हणाल्या, “चतुरांग अर्धांगवायूमुळे कोणतीही गोष्ट माझ्या इच्छेनुसार घडत नाही. परंतु, मी दररोज जे हे लहान लहान त्याग देवाच्या हाती सोपवते आणि ज्या निवडी करते, त्या निवडीच एक दिवस गौरवात तळपतील. या प्रत्येक त्यागाची गणना होईल.
जोनीने खूप मोठे दुःख अनुभवले आहे, परंतु आमच्या संभाषणाने मला आठवण करून दिली की ती रोजच्या निवडींचा सामना करते, अगदी आपल्याप्रमाणेच — हानी आणि निराशेमध्ये देवाकडे वळण्याचा. मग ती सुट्टीपूर्वीची अनपेक्षित नोकरी जाण्याची बातमी असो, कित्येक दिवस बिछान्यात खिळवून ठेवणारा आजार असो, किंवा थंड, तुटक सहचरा सोबत वर्षानुवर्षे राहण्याची परिस्थिती असो — या सर्व परीक्षा, ज्या आपण देवासमोर ठेवतो आणि सहन करण्यासाठी कृपेची याचना करतो, त्या केवळ आपल्या विश्वासाला वाढवतील असे नाही, तर त्या आपल्यासाठी स्वर्गीय प्रतिफळही साठवतील.
शेवटच्या रडण्यापर्यंत तुटलेले गुडघे
देव आपल्या प्रत्येक दुःखाकडे पाहतो. आपल्या वेदनांमध्ये तो आपल्यावर कोमल प्रेम करतो. तो प्रत्येक जागरणाची रात्र, प्रत्येक न सांगितलेले दुःख, आणि आपण सहन केलेला प्रत्येक आघात ओळखतो. आपला प्रत्येक क्षण जाणणाऱ्या, पाहणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या देवाने आपल्या वेदनांना उद्देश दिला आहे.
आपल्या आयुष्याच्या शेवटी जाणवणाऱ्या अज्ञात वेदनांमध्येही एक अर्थ आहे. या वेदनांमुळे कदाचित आपले व्यक्तिमत्त्व बदलणार नाही, किंवा त्यातून कोणताही सांसारिक आदर्श तयार होणार नाही, परंतु देव सर्व पाहतो. आपण सहन केलेल्या वेदनांचा तो साक्षीदार असतो. आणि जेव्हा तो आपल्या सहनशीलतेकडे पाहतो, तेव्हा त्या द्वारे त्याला गौरव मिळतो आणि त्याचा मोबदला तो आपल्याला देतो. जॉन पायपर ह्यांनी आपल्या अंतिम क्षणांत दुःख सहन करणाऱ्या व्यक्तींना उद्देशून म्हटले आहे:
“जेव्हा देव तुम्हाला शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी कृपा देतो, त्याला दोष न देता, शक्य तितके त्याच्यावर विसंबून राहण्याची क्षमता देतो, तेव्हा पुढचे वीस तास तुमच्या सार्वकालिक गौरवाच्या अनुभवात मोठा, अमूल्य फरक घडवून आणतील. हे तास निरर्थक नाहीत… ते तुमच्या पृथ्वीवरील व्यक्तिमत्त्वाला चमकवणार नाहीत, कारण तुम्ही लवकरच येथून निघून जाणार आहात. तेथे व्यक्तिमत्त्व उरणार नाही. पण जेव्हा तुम्ही आता आणि सार्वकालिकतेच्या सीमारेषा ओलांडाल, तेव्हा देव तुम्हाला दाखवेल की ते वीस तास तसे का होते आणि त्यातून तुमच्यासाठी काय निर्माण झाले. हीच सुवार्ता आहे.”
आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आपले सर्व दुःख महत्त्वाचे आहे. आपले प्रत्येक नुकसान आणि प्रत्येक वेदना, ज्या आपण ख्रिस्ताकडे वळवतो, त्या आपल्यासाठी प्रतिफळ निर्माण करतील. साध्या मुरगळलेल्या घोट्यापासून आयुष्याला कलाटणी देणाऱ्या निदानापर्यंत, (क्वाड्रिप्लेजियाच्या) अक्षमतेमुळे रोजच्या त्यागांपासून जीवनाच्या अंतिम दु:खद क्षणांपर्यंत—यांपैकी काहीही वाया जाणार नाही.
दु:खाचे रूपांतर आनंदात झाले
आपण अनुभवू शकणाऱ्या सर्वात मोठ्या आनंदांपैकी एक म्हणजे नुकसानानंतर पुनर्स्थापनेचा आनंद. पवित्र शास्त्रामधील स्तोत्र126 आणि योहान 16 हे दोन्ही अध्याय (जे ईएसव्ही अनुवादात “आनंद” या शब्दाचा सर्वाधिक वापर करतात) पुनर्स्थापनेबद्दल आहेत. स्तोत्र126म्हणते, “सीयोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले, तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हांला वाटले…जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील (स्तोत्र 126:1,6).” आणि योहान 16 म्हणतो, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल…तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा (योहान 16:20,24).”
येशू आपल्याला सांगतो की हरवलेले एक नाणे सापडल्याचा आनंद तो कधीही न हरवण्याच्या आनंदापेक्षा मोठा आहे. हरवलेल्या मेंढीला सापडल्याचा आनंद मेंढ्यांसोबत कायम राहण्याच्या साध्या आनंदापेक्षा जास्त आहे. आणि पश्चात्ताप करणाऱ्या पाप्याच्या बदलामुळे स्वर्गातील देवदूतांमध्ये अधिक आनंद होतो (लूक 15:7). जरी कोणीही नुकसान शोधत नाही, तरीही पुनर्स्थापना अधिक आनंद देते. आपण सहन केलेल्या प्रत्येक दुःखासाठी, प्रत्येक सहन केलेल्या नुकसानीसाठी, प्रत्येक अपूर्ण इच्छेसाठी, स्वर्गात ती पूर्ण होताना आपला आनंद अधिक खोल होईल.
आणि जोनाथन एडवर्ड्स म्हणतात,
“इतर जण गौरवात श्रेष्ठ आहेत म्हणून, ज्यांना आनंद व गौरवाची निम्न पातळी प्राप्त झाली आहे, त्यांच्या आनंदात काहीही उणीव भासणार नाही. कारण तेथे प्रत्येक जण पूर्णपणे सुखी व समाधानी असेल”. प्रत्येक पात्र, जरी आकाराने भिन्न असेल, तरी त्या आनंदाच्या महासागरात पूर्ण भरलेले असेल. स्वर्गात मत्सराचे अस्तित्व नसेल, तर पूर्ण प्रीती संपूर्ण समाजात राज्य करेल” (वर्क्स ऑफ जोनाथन एडवर्ड्स, 50:53/ Works of Jonathan Edwards, 50:53)
स्वर्गात, ज्यांनी विश्वासूपणे दुःख सहन केले आहे, त्यांच्या प्रतिफळाविषयी कोणालाही मत्सर वाटणार नाही, कारण तेथे प्रत्येक जण आनंदात ओतप्रोत भरलेला असेल. आपल्यापैकी प्रत्येकजण पूर्णपणे समाधानी असेल, पूर्णपणे आनंदी असेल, आणि पूर्णपणे परिपूर्ण होईल. पण काहींच्या आनंदाची पात्रे इतरांपेक्षा विशाल असू शकतील, ज्यात स्वर्गातील अधिक आनंद सामावू शकेल. आणि कदाचित संकटांमधून तग धरल्यामुळे मिळणारे विशेष प्रतिफळच हा आनंद अनुभवण्यासाठी अधिक क्षमता प्रदान करेल.
जर तुम्ही आज दुःख सहन करत असाल, मग ते छोट्या संकटामुळे असो किंवा मोठ्या दु:खद घटनेमुळे, मनात नैराश्य आणू नका. येशू ख्रिस्ताकडे वळा आणि सहन करण्यासाठी त्याची कृपा मागा. विश्वास ठेवा की, तुमचा संघर्ष सार्वकालिक गौरवाचा भार निर्माण करीत आहे, जे तुमच्या वेदनांपेक्षा खूपच अधिक असेल. संकटातही देवाला तुमचा खजिना बनवा आणि त्याच्यावर शेवटपर्यंत विश्वास ठेवा, तुमचे प्रतिफळ महान असेल.
लेखक
वनिता रेंदाल रिसनर