लेख
स्टीव्हन ली
प्रत्येक विश्वासी व्यक्तीला इतर विश्वासूंशी आध्यात्मिक जवळीक हवी असते. ह्याला आपण सहभागिता, एक सामुदायिक भावना किंवा एकत्र आयुष्य जगणे असे देखील म्हणू शकतो. देवाने आम्हाला एकट्या जंगलात राहणार्या योद्ध्यासारखे घडवले नाही. तर त्याने आम्हाला मंडळीमध्ये आणून तारले आहे. त्याने आम्हाला अंधाराच्या राज्यातून बाहेर काढून, ख्रिस्ताच्या शरीराच्या स्थानिक स्वरूपांमध्ये बोलावले आहे.
आणि तरीही, आध्यात्मिक समुदाय मिळविणे कठीण आहे, हे काही आपोआप घडत नाही. तर हे देवाकडून देणगी स्वरुपात घडून येते आणि आपण देखील जाणीवपूर्वक ख्रिस्ती आपुलकी आणि परस्पर समजूतदारपणा जोपासतो म्हणून तो सहसा देतो. मग, आपण एकत्र अशा प्रकारचे जीवन कसे जोपासू शकतो?
एकत्र येऊन अशा प्रकारचे जीवन जोपासण्याचा एक सिद्ध मार्ग म्हणजे एकत्र प्रार्थना करणे होय. इतर विश्वासणाऱ्यांसोबत एकत्र होऊन देवाच्या सिंहासनासमोर आपली अंतःकरणे उघडण्यापेक्षा अधिक एकत्र होण्याचा कोणता चांगला मार्ग आहे? त्याच्याकडे प्रार्थनेत जाणे, ही एक उत्तम संधी आणि विशेषाधिकार आहे!
सामायिक प्रार्थना मंडळीमध्ये बदल घडवून आणते.
सामायिक अनुभव—एखादा संगीत मैफलीचा कार्यक्रम, सुट्टी किंवा साहस—हे एक बंध निर्माण करतात. अशा आठवणी अनेकदा खोलवर रुजतात आणि चिरकाल टिकणारे स्नेह निर्माण करतात. त्या आठवणी नातेसंबंधांना मजबूत करण्यासाठी एक प्रकारच्या चिकट डिंकाप्रमाणे काम करतात. माझ्या बायकोबरोबर सुट्ट्यांमध्ये लाभलेल्या क्षणांमुळे, जेव्हा जीवनात कठीण प्रसंग आले, तेव्हा आमच्या लग्नाला बळकटी मिळाली आहे. विशेषत: जेव्हा जीवन कठीण होते, तेव्हा या सामायिक आठवणी कोमलता, समजूतदारपणा आणि प्रेम निर्माण करतात.
मंडळीमध्येही, अशाच प्रकारच्या सामायिक जीवनाने परस्पर प्रशंसा, ऐक्य, आणि विश्वास निर्माण होऊ शकतो. जेव्हा आम्ही सोबत संघर्षांचा सामना केला आहे, आध्यात्मिक लढाईत एकत्र लढतो तेव्हा मी माझ्या सहवडिलधाऱ्यांकडे अधिक प्रेमाने पाहतो.
एकत्रित प्रार्थना हा मंडळीमधील सामायिक अनुभव असू शकतो. मी कोणत्याही विशिष्ट कार्यक्रमाचे किंवा उपक्रमांचे समर्थन करीत नाही, तर आपली मंडळी औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रार्थनेने भरले जावे आणि त्यातून सर्वांना एकत्र बांधले जावे, असा माझा उद्देश आहे. या प्रार्थना वेळांना तुम्ही मंडळीच्या भट्टीच्या खोलीसारखे समजू शकता. जशी उष्णता आणि उब येते, तशीच उब मंडळीमध्ये देवाचे लोक एकत्र प्रार्थनेत सहभागी होत असताना पसरते. देवावरच्या या सामूहिक अवलंबित्वाने मंडळीच्या स्वभावात आणि संस्कृतीत कसा बदल घडतो, हे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिले आहे.
आमच्या मंडळीमध्ये प्रत्येक रविवारी सकाळी, प्रार्थना खोलीत एक छोटा गट एकत्र येतो. सेवा सुरू होण्यास अजून 45 मिनिटे बाकी असतात, पण प्रभूसोबतचे संवाद आधीच सुरू झालेले असतात. आम्ही एकत्र येतो, जेणेकरून देव त्याच्या गौरवासाठी आणि उद्दिष्टांसाठी कार्य करेल, ह्यासाठी त्याला आळवतो. ख्रिस्तामध्ये प्रकट झालेल्या त्याच्या कृपेचे गाणे गातो. प्रचारकाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि देवाच्या वचनानुसार चालावे, अशी प्रार्थना करतो. आमच्या दु:ख सहन करणाऱ्या विश्वासू लोकांसाठी ही प्रार्थना करतो, जेणेकरून त्यांना दिलासा मिळावा. आमच्या पाहुण्यांसाठी, आमच्या लोकांसाठी, आमच्या शेजार्यांसाठी आणि राष्ट्रांसाठी प्रार्थना करतो. आम्ही दयेसाठी आळवतो आणि आमच्या पापांची कबुली देतो. हा एक पवित्र क्षण असतो. कोणताही दिखावा नाही, कोणतेही चमत्कार नाहीत, पण वारंवार आम्ही पाहतो की देव येतो, आम्हाला भेटतो आणि आमच्या प्रार्थनांना उत्तर देतो.
प्रार्थनेच्या या वेळांनी आमच्यात ख्रिस्तासारखी आपुलकी निर्माण केली आहे. जर अधिक मंडळ्यांनी अशा प्रकारच्या प्रार्थनेसाठी स्वतःला वाहून घेतले, तर काय होईल?
सामायिक प्रार्थना आपल्या अंतःकरणांना जोडते
एकत्र प्रार्थना करणे मंडळीमधील शरीराच्या अवयवांमध्ये जोडणाऱ्या ऊतीसारखे कार्य करते. प्रेषित पौल 1 करिंथ 12 मध्ये मंडळीला एका भौतिक शरीराप्रमाणे पाहतो. प्रत्येक विश्वासणारा या शरीराचा एक महत्त्वाचा भाग किंवा अवयव आहे. प्रत्येकजण वेगळा आहे, पण सर्व ख्रिस्ताखाली एकत्र जोडलेले आहेत. त्यामुळे आरोग्यपूर्ण राहण्यासाठी या एकतेमध्ये वैविध्य आवश्यक आहे. प्रत्येक वेगळा भाग एकत्र कार्य करणे गरजेचे आहे; अन्यथा शरीर कार्यक्षम राहत नाही आणि कार्य करणे थांबते.
पौल लिहितो, “डोळ्याने हाताला सांगू नये, ‘माझी तुला गरज नाही,’ किंवा डोक्याने पायाला पुन्हा सांगू नये, ‘माझी तुला गरज नाही’” (1 करिंथ.12:21). हात, डोके, पाय, कान किंवा डोळे यांशिवाय शरीर आपल्या अपेक्षेनुसार कार्य करू शकत नाही. प्रत्येक भाग अत्यावश्यक आहे. पण हे विविध भाग एकत्र कसे कार्य करायला लागतील? ही अद्वितीय एकता, समान विचारसरणी आणि सहकार्य कसे निर्माण करायचे? ह्याचे उत्तर आहे: आपण एकत्र प्रार्थना केली पाहिजे.
जेव्हा आपण एकत्र प्रार्थना करतो, तेव्हा देव आपली हृदये एकमेकांशी जोडतो. प्रार्थनेत माझ्या बंधू-भगिनींच्या प्रेरणा आणि इच्छांचा उलगडा होतो. त्यांच्या विश्वासाच्या खोल झऱ्यांमध्ये मला अंतर्दृष्टी मिळते. मला त्यांच्या करुणेचे हृदय दिसते. हरवलेल्या लोकांप्रती त्यांचे प्रेम ऐकायला मिळते. ख्रिस्तावरील त्यांचे प्रेम जाणवते. त्यांच्या दृढ विश्वासाची जाणीव होते. एकमेकांबद्दलची समज वाढते, आणि ती समज खरी आणि टिकाऊ प्रेमासाठी महत्त्वाची आहे.
प्रार्थनेमुळे ऐक्याला चालना मिळते. माझ्या भावाची स्तुती मला प्रेम आणि चांगली कामे करण्यास प्रेरित करते. माझ्या बहिणीच्या विनवण्या मला आव्हान देतात आणि उभारी देतात. इतरांच्या प्रार्थना माझ्या स्वतःच्या उणिवांची जाणीव करून देतात. काहींच्या अंगीकारामुळे माझ्या हृदयात कृतज्ञतेची भावना निर्माण होते. थोडक्यात, इतरांच्या प्रार्थना ऐकताना मला कृपेचा अनुभव येतो.
ख्रिस्ताच्या शरीराच्या बहुविध प्रार्थना या देवाचा गौरव आणि त्याचे कार्य ह्यांची अद्भुत महती प्रकट करतात. आपण पाहतो आणि ऐकतो त्यापेक्षा कितीतरी अधिक जाणतो, आणि हे आपल्याला ख्रिस्तासाठी अधिक पूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा देते.
सामायिक प्रार्थनेमुळे आनंद द्विगुणित होतो
डायट्रिच बोनहोफर आपल्या लाइफ टुगेदर/Life Together ह्या पुस्तकात, विश्वासणाऱ्याला इतर विश्वासणाऱ्यांची गरज का असते, यावर विचार करतो. तो म्हणतो, “त्याच्या स्वतःच्या हृदयातील ख्रिस्त हा त्याच्या भावाच्या वचनातील ख्रिस्ताच्या तुलनेत कमजोर आहे; त्याचे स्वतःचे हृदय अनिश्चित आहे, त्याच्या भावाचे मात्र ठाम आहे” (12). तुम्ही कधी असे क्षण अनुभवले आहेत का, जेव्हा तुम्हाला मित्राच्या अधिक सामर्थ्यवान, परिपूर्ण, आनंदी हृदयाची गरज भासली आहे? देव आपल्याला आवश्यक असलेली उभारी अनेकदा इतरांमार्फत देतो. आपल्याला बौद्धिक पातळीवर सत्य माहीत असते, पण जेव्हा आपण इतरांना त्यावर विश्वास ठेवताना आणि त्याबद्दल आनंद व्यक्त करताना ऐकतो, तेव्हा ते सत्य आपल्यावर अधिक प्रभावीपणे उमटते. त्याचा आनंद अनेकदा आपल्यालाही आनंद देतो.
हा अनुभव पुन्हा पुन्हा दिसून येतो, जेव्हा आपण एकत्र प्रार्थना करतो. देव एका भरकटलेल्या हृदयाला सहविश्वासणाऱ्याच्या प्रार्थनांद्वारे परत बोलावतो. जेव्हा आपल्याला प्रार्थनेसाठी शब्द सापडत नाहीत, तेव्हा आपण तरीही दुसऱ्यांच्या प्रार्थनांना आमेन म्हणू शकतो. जेव्हा आपली करुणा थंडावते, तेव्हा आपण एका बहिणीच्या मनःपूर्वक केलेल्या हाकांमध्ये सहभागी होऊ शकतो. अनेकदा मी अनुभवतो की, माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या प्रार्थनांमुळे माझे हृदय उबदार होते. त्यांनी शब्द उच्चारले, पण माझे हृदय आणि आत्मा त्यावर सहमती दर्शवण्यासाठी उभे राहिले. सी.एस. लुईसच्या प्रतिमेचा आधार घेत, टिम केलर लिहितो:
मित्रांसोबत प्रार्थना करताना, तुम्हाला येशूचे असे पैलू ऐकायला आणि पाहायला मिळतात, जे तुम्ही अद्याप अनुभवलेले नसतात…परमेश्वर सांप्रदायिक आणि एकत्रित आहे हे जाणून आपण एकत्रितपणे प्रार्थना आणि स्तुती केली पाहिजे. अशा प्रकारे “आपण जेवढी स्वर्गीय भाकरी आपल्यात वाटून घेऊ तितके आपल्या सर्वांना मिळेल (प्रेयर,119/Prayer,119).
आपल्या सहविश्वासणाऱ्यांद्वारे, विशेषतः त्यांच्या प्रार्थनांद्वारे, आपण ख्रिस्ताला अधिक ऐकतो आणि पाहतो. इतरांसोबत प्रार्थना करणे हे देवाने आपल्याला आपल्या विश्वासाच्या फायद्यासाठी दिलेले एक वरदान आहे. यामुळे आपले मन सजीव होते, हृदय अधिक बळकट होते आणि आपले हात सामर्थ्यशाली होतात.
कोणताही ख्रिस्ती एकट्याने चांगला धावू शकत नाही. कोणताही विश्वासणारा एकटा उभा राहू शकत नाही. देवाचा कोणताही मुलगा किंवा मुलगी एकटी लढत नाही आणि जिवंत राहत नाही. म्हणूनच, प्रार्थनेसाठी स्वतःला वाहून घ्या. एकत्र गुडघ्यावर या आणि अलौकिक एकता आणि समान विचारसरणीचा पाठपुरावा करा. येशूला स्तुती, पापांची कबुली, कृतज्ञता, आणि याचना यांद्वारे तुमची हृदये एकत्र गुंफू द्या. एकत्र प्रार्थना करणे आनंदाच्या ज्योती अधिक तेजस्वी करते.
तर मग, जर तुम्ही अधिक वेळ एकत्र प्रार्थना करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले, तर देव तुमच्या मंडळीमध्ये काय करू शकेल?