आधुनिकतेची जादू मोडून काढणे

 “नकली! नकली! खेळणं, खेळणं, खेळणं!” माझ्या भरलेल्या प्राण्यांपैकी मी एक मोठा कुत्रा दाखवला असता डॅनी आणि लिन ओरडले. मी साधारण सहा वर्षांचा होतो आणि ते साधारण दहा आणि बारा वर्षांचे होते. माझी जनावरे खरी असल्याचा दावा मी केला होता. त्यांनी मला सांगितले की मी मोठे व्हावे आणि बाळ असणे थांबवावे. प्रतिसादामध्ये, मी ज्याला मोठे अस्वल म्हणत असे तो त्यांच्यासमोर आणला. मला वाटले की जर मी त्यांना त्याच्याबद्दल पुरेसे सांगितले तर त्यांना माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. पण त्यांनी फक्त अधिकच टोमणे मारले, “नकली! नकली!” तो अपमान मला अजूनही जाणवतो.

पण मला माझा विश्वासही आठवतो. अर्थात मला समजले की माझी खेळणी खरी नाहीत, आमचा कौटुंबिक बॉक्सर कुत्रा जसा खरा आहे तशी ती नाहीत. पण मला हेही माहीत होते की आपल्या तात्कालिक इंद्रियांना जे समजते त्यापेक्षा जगात बरेच काही आहे. मला माहीत होते की संशयवादी जे पाहतात त्यापेक्षा कल्पनाशक्ती आणि विश्वास जास्त प्रकट करतात. आणि ज्या काळात आपली संस्कृती वास्तव काय आहे आणि त्याचे वर्णन कसे करावे यावरून संघर्ष करते, तेव्हा ते महत्वाचे असते.

‘माझ्या जगाशिवाय दुसरे नाही’

सी. एस. लुईस यांच्या ‘द सिल्व्हर चेअर’ मधील एका थरारक दृश्यातून खरे काय याची लढाई चालते. हरवलेल्या प्रिन्स रिलियनला वाचवण्यासाठी इंग्रज शाळकरी लेकरं जिल आणि युस्टेस यांना अस्लान या महान सिंहाने नार्नियाच्या जादुई राज्यात पाठवले. नार्नियाची सुंदर पृष्ठभूमी आणि आकाशाखालील दमट आणि चैतन्यहीन प्रदेश असलेल्या अंडरलँडच्या चेटकीन राणीने त्याला पकडलेले असते. जेव्हा लेकरांनी रिलियनला शोधले आणि त्याला मुक्त केले, तेव्हा चेटकीन प्रकट होते. परंतु त्यांना शारीरिकदृष्ट्या वश करण्याऐवजी, चेटकीन त्यांना मंत्रमुग्ध करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ते तिच्या अंधुक छायेच्या प्रदेशातून पळून जाण्याची इच्छाही करणार नाहीत.

चेटकीण पेटलेल्या शेकोटित जादूचे चुर्ण फेकते आणि ती “स्थिर, नीरस सूर काढत असलेले” एक तंतुवाद्य वाजवते. मग ती त्यांच्यासाठी वास्तवाची व्याख्या करू लागते. विसाव्या शतकातील इंग्लंडचे जग (जिथून ते आले) केवळ काल्पनिक आहे. नार्निया – त्याचे बोलणारे प्राणी, चमकणारे तारे, तेजस्वी सूर्यप्रकाश आणि ज्वलंत रंगांसह – केवळ एक कल्पना होती. “असे जग कधी नव्हतेच,” असे चेटकीन म्हणते. मुले तिच्या शब्दांची पुनरावृत्ती करतात. मग ती ठामपणे सांगते, “माझ्या जगाशिवाय दुसरे जग कधी नव्हतेच” (630). ते पुन्हा पोपटासारखे तिच्या शब्दांची पुनरावृत्ती करतात. ते तिच्या खोटेपणात स्थिरावतात आणि तिच्या जादूशी लढणे थांबवून त्यांना दिलासा मिळतो. ते जवळजवळ हरवून जातात.

आधुनिक जादू

“माझ्या जगाशिवाय दुसरे जग कधी नव्हतेच.” या शब्दांनी तुमच्यावर कोणी जादू करत आहे का? ते आपल्याला सांगतात की आपला प्राचीन ख्रिस्ती विश्वास आपल्याला “इतिहासाच्या चुकीच्या बाजूला” ठेवतो. त्या विलोभनीय मोहामुळे “तसे असेल तर?” असा प्रश्न तुम्हाला पडतो का?  चेटकीन-राणी शांतपणे, पण सतत आपल्या खोटेपणाची पुनरावृत्ती करते. प्रत्येक सुशिक्षित आणि प्रज्वलित माणसाला काय माहीत आहे ते ती सांगते :

हे जग कोणत्याही वैयक्तिक देवाने शून्यातून निर्माण केलेले नाही. आपल्यावर काहीही नाही आणि आपणच स्वत:चा अर्थ ठरवतो.

स्त्रीच्या गर्भातील भ्रूण अद्याप व्यक्ती नसतो. “तो” तिच्या शरीराचा फक्त एक भाग आहे आणि तिच्या सार्वभौम नियंत्रणाखाली आहे.

प्रत्येक व्यक्ती किंवा समूहातील मूळ प्रेरणा म्हणजे सत्ता आहे. बहुसंख्य गटातील असाल तर तुम्ही अत्याचारी बनणे कधीच थांबवू शकत नाही. अल्पसंख्याक गटातील असाल तर तुम्ही कायम बळीच असता.

तथापि, आपण आपल्या जैविक लिंगाची पर्वा न करता नेहमीच आपली लिंग ओळख निश्चित करू शकता. “अवस्थांतर” करण्याच्या कोणत्याही प्रक्रियेला विरोध करणे घृणास्पद असून ते इतरांना नैराश्य आणि आत्महत्येस प्रवृत्त करते.

मला गरज आहे ती माझ्या स्वत:च्या अभिव्यक्तीत अडथळा आणणार्‍या कोणत्याही व्यक्ती, नैतिकता किंवा समूहापासून मुक्त होण्याची. मला स्वत:पासून मुक्त होण्याची गरज नाही; मला स्वत:मध्ये मुक्त झाले पाहिजे.

“ही सोपी सत्ये आहेत,” आजची चेटकीन-राणी शेकोटीवर आणखी चुर्ण फेकत म्हणते. “त्यांना विरोध केल्याने तुमचा बोलण्याचा, काम करण्याचा किंवा पुढे जाण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. माझ्या जगाशिवाय दुसरे जग कधी नव्हतेच.”

अस्लानच्या बाजूने

मुले आणि प्रिन्स रिलियन मोहाला जवळजवळ बळी पडतात. शेवटी त्यांना आता नार्निया दिसत नाही. कदाचित त्यांच्या आठवणी केवळ स्वप्नांचे अवशेष बनले असतील. पण राजकुमाराला वाचवण्याच्या शोधात त्यांच्यासोबत आणखी एक साथीदार आहे. पोडलेग्लम, मार्श-विगल नावाचा एक विचित्र प्राणी, त्याच्या नावाप्रमाणेच तो उग्र वास्तववादी आहे. पण त्याचे उदास व्यक्तिमत्त्व त्याला मोहाविरुद्ध अधिक प्रतिरोधक बनवते.

खूप उशीर होण्याआधीच पुडलेग्लम मोठ्या प्रयत्नाने स्वत:ला उठवतो आणि शेकोटीच्या दिशेने सरकतो. तो आपला एक मजबूत नग्न पाय आगीच्या ज्वाळांमध्ये टाकतो. भयानक वेदनेने त्याचे डोके साफ होते. जादूच्या चुर्णाचा सुगंध कमी करत त्याने बरीच आग ही विझवलेली असते.  चेटकीन रागावते. पण लेकरं शुद्धीवर येऊ लागतात.

मग पुडलेग्लम इंग्रजी साहित्यातील काही महान ओळींसह चेटकीन-राणीचा सामना करतो.

“एक शब्द, मॅडम,” तो आगीतून यातनांमुळे लंगडत बाहेर येताना म्हणतो. “एक शब्द. . . . समजा आपण फक्त त्या सर्व गोष्टींची स्वप्ने पाहिली असतील किंवा कल्पना केली असेल – झाडे आणि गवत आणि सूर्य आणि चंद्र आणि तारे आणि स्वत: अस्लान. समजा आपण तसे केले असेल. तर मग मी एवढंच सांगू शकतो की, अशा वेळी कल्पिलेल्या गोष्टी खऱ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाच्या वाटतात. समजा तुमच्या राज्याचा हा काळा खड्डा हे एकमेव जग आहे. हे तर मला फारच खराब अवस्थेत दिसते आणि जेव्हा आपण याचा विचार करता तेव्हा ही एक गंमतीशीर गोष्ट आहे. आपण बरोबर असाल तर आम्ही फक्त खेळ बनवणारी लेकरं आहोत. पण एक खेळ खेळणारी चार लेकरं तुमचं खरं जग पोकळ करणारं खेळण्याचे जग बनवू शकतात. म्हणूनच मी त्या खेळण्याच्या जगाच्या बाजूने उभा राहणार आहे. मी अस्लानच्या बाजूने आहे, जरी त्याचे नेतृत्व करण्यासाठी अस्लान नसला तरी. नार्निया नसला तरी मी जमेल तितका नार्नियाच्या व्यक्तीसारखा जगणार आहे.” (633)

“एक खेळ खेळणारी चार लेकरं तुमचं खरं जग पोकळ करणारं खेळण्याचे जग बनवू शकतात.” विश्वासाच्या कल्पनेतून (पवित्रशास्त्राच्या प्रकट वचनावर आधारित) आपण जे पाहतो ते आत्मकेंद्रित जगाच्या सर्व अत्याधुनिक वाटणार्‍या भूमिकांपेक्षा कितीतरी अधिक कुतुहलास्पद आणि आश्चर्यकारक आहे.

त्याचे डोळे उघड

फार पूर्वी अलीशा संदेष्ट्याने इस्राएलच्या राजाला आरामाच्या राजाच्या योजनांबद्दल सावध केले होते. त्याच्या अलौकिक ज्ञानाने इस्राएलच्या राजाला युद्ध आणि विनाशापासून वाचवले. त्यामुळे आरामाच्या राजाने अलीशाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. एके रात्री त्याचे सैन्य आणि रथांनी संदेष्टा राहत असलेल्या शहराला वेढा घातला. पहाटे अलीशाचा नोकर घेराव बघून घाबरला.

सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ ह्यांसह नगराला वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्याला म्हणाला, “स्वामी, हायहाय! आता आपण काय करावे?” तो म्हणाला, “भिऊ नकोस; त्यांच्या पक्षाचे आहेत त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. (2 राजे 6:15–17)

दैहिक डोळ्यांना फक्त ऐहिक गोष्टी दिसत होत्या. भयंकर आरामी योद्धे आणि रथांनी शहराला वेढा घातला. पण आत्म्याने सक्षम केलेल्या विश्वासाच्या डोळ्यांना वास्तवाचे बरेच काही दिसले. परमेश्वराच्या विशाल आणि सामर्थ्यवान सैन्याने आपल्या नगरात संदेष्ट्याचे रक्षण केले. देवाच्या देवदूतांच्या सैन्याकडे अग्नीचे रथ होते! आरामाच्या राजाच्या हाती वास्तव नव्हते. डोळ्यांना दिसते त्यापेक्षा खूप काही जगामध्ये घडते. सार्वभौम देव अजूनही राज्य करतो आणि त्याच्या उद्देशानुसार सर्व गोष्टी करतो.

ही एक कल्पना आहे का? आत्म्याने उघडलेले विश्वासाचे डोळे मोठे चित्र पाहतात. इब्री 12:1 आम्हाला सांगते की “आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत,” ते सर्व लोक विश्वासूपणे आपल्यासमोर गेले आहेत. आजच्या अविश्वासाचे कथित “वास्तविक जग” एका निस्तेज समानतेखाली स्वत:ला कंटाळवाण्या तुरुंगात डांबून बसले आहे. पवित्रशास्त्राची दृष्टी अधिक गौरवशाली वास्तव प्रकट करते.

भिषण कहाण्या पोकळ होतात

जेव्हा आपण आपल्या आधी गेलेल्या संतांची बाजू घेतो, तेव्हा आजच्या सुसंस्कृतांकडून आपल्याला डावलले जाऊ शकते किंवा आपला तिरस्कार केला जाऊ शकतो. असू द्या. ज्यांच्यासोबत आपणास राहण्यास मिळते त्याचा विचार करा. मरीया मग्दालीया आणि एथनासियस, जॉन कॅल्व्हिन आणि क्रिस्टीना रोसेटी आणि (अजूनही आमच्याबरोबर असलेले) जॉनी एरेक्सन टाडा आणि जॉन पाइपर हे आमच्या मार्गावर आम्हाला प्रोत्साहन देत आहेत.

शतकानुशतके असंख्य लोक आपल्यात सामील होतात. येशूवरील विश्वासाच्या साक्षीने आपण सर्व जण जोडलेले आहोत. ही अद्भुत मंडळी आपली संस्कृती कैद करण्याचा प्रयत्न करणार्‍या भीषण कहाणीला पोकळ करते. केंद्र म्हणून माझ्याभोवती फिरणारी कुठलीही वैश्विक दृष्टी किती मंद, किती एकाकी आहे. देवाकडे अजून बरंच काही आहे.

स्वत:ला सार्वभौम असल्याचे भासवून, शून्याभोवती फिरत मी कधी एकटा का जाणार? त्याऐवजी देवाचे सार्वभौमत्व मान्य करून मी सर्व संतांच्या सहवासात आणि सृष्टीच्या सर्व वैभवात घेतला जातो. आता आपण भौतिक दृष्टीने नव्हे, तर विश्वासाने चालतो. परंतु विश्वासाची देणगी आपल्याला देवाच्या गौरवशाली वास्तवाच्या आध्यात्मिक दृष्टीप्रती उघडते.

माझ्याकडे अजूनही तो मोठा कुत्रा आहे. तो आमच्या कपाटावर ठेवलेला आहे. तिथून जाताना मी कधीकधी त्याला थोपटतो आणि त्याच्याशी बोलतो. मला माहीत आहे की तो खरा नाही. मला हे देखील माहीत आहे की कल्पनाशक्ती आणि विश्वास या जगाला न दिसणारी दृश्ये प्रकट करतात. मी त्या देवाला ओळखतो ज्याने त्वचेत आणि हाडात येऊन जगात प्रवेश केला, तो पूर्णपणे मरण पावला आणि नंतर या जगात पुन्हा सार्वकालिक जीवनासाठी उठला. जग म्हणेल, “नकली! खेळणे!” पण मी म्हणतो, “खरे! खरे! वास्तविक, वास्तविक, वास्तविक!”

लेख

गेरीट स्कॉट डॉसन

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *