मला कधी कधी असे वाटते की, जोपर्यंत माझ्याकडे काहीतरी महान काम करण्यासाठी आहे, तो पर्यंत मी जिवंत असणार आहे. माझी सासू, जोनी, ही माझी पत्नी आणि माझ्यासोबत राहते. ती 100 वर्षांची असली तरी तिची तब्येत तुलनेने बऱ्यापैकी आहे. ती हसते. ती रडते. कधी-कधी ती विनोद देखील करते. तिच्या नातवंडांना आणि पणतू ह्यांना तिला भेटायला आवडते. तिच्या तारुण्यपणाच्या गोष्टींनी त्यांना भारावून टाकले आहे.
गेल्या आठवड्यात, तिने मला सहजपणे सांगितले की, तिने दानिएलाच्या पुस्तकाचा महिन्याभराचा अभ्यास पूर्ण केला आहे. “दानिएलचे पुस्तक!” मी खूप आश्चर्यचकित झालो. मला अस वाटत नाही की, 100 व्या वर्षी माझ्या निवडक कामाच्या यादीमध्ये, त्या भविष्यसूचक आणि रहस्यांना प्रकट करणाऱ्या पुस्तकाचे अध्ययन करणे सामिल असेल. परंतु मला आता हे कळते, की कदाचित त्या पुस्तकाचाही समावेश असायला पाहिजे.
तरीही जोनीला एक विशिष्ट प्रश्न भेडसावत आहे. तो वारंवार तिच्या मनात येतो, विशेषकरून त्या दिवशी ज्यावेळेस तिची मनस्थिती नाजूक असते किंवा तिचा रक्तदाब हा वाढलेला असतो. तो प्रश्न आहे, मी अजूनही इथे का आहे?
तुम्ही कुठल्या गोष्टींसाठी जगत आहात?
जोनीचा पती ह्या जगात नाही. तिचा थोरला मुलगा सुद्धा ह्या जगात नाही. तिची बहीण 108 वर्षे जगली आणि गेल्या डिसेंबरमध्ये ती सुद्धा आम्हाला सोडून गेली. तिचे सांधे दुखतात. आपल्या समाजाच्या दुखःद नैतिक पतनाबद्दल तिला दुःख वाटते. ती घरी (येशूकडे स्वर्गात) जाण्यासाठी तयार आहे. तर मग हा प्रश्न परत उद्भवतो: “मी अजूनही इथे का आहे?”
कदाचित एका सार्वभौम देवामध्ये असलेली निश्चल सांत्वना ज्यामागील कारणे त्याच्याकडे नेहमीच गुप्त असतात, सर्वोत्तम प्रतिसाद असू शकतो. असे असले तरी, मला वाटते की ह्या विषयी आपल्याकडे अंशतः उत्तर आहे.
१९७५ मध्ये, २० वर्षांचा एक महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून, मला ह्या उत्तराचा एक मूल्यवान भाग सापडला. मी डीयट्रिक बोनहोफर यांची तुरुंगातील पत्रे आणि लेख आणि त्यांचा मित्र एबरहार्ड बेथगे यांच्या द्वारे लिहलेले त्यांचे जीवन चरित्र वाचले आहेत. तुरुंगात जवळ जवळ एक वर्ष राहिल्यानंतर, आणि नाझींद्वारे त्यांना फाशी देण्याच्या सुमारे एक वर्ष आधी, त्यांनी एबरहार्डला सांगितले होते की, “मला कधी कधी असे वाटते की, जोपर्यंत माझ्याकडे काहीतरी महान काम करण्यासाठी आहे तो पर्यंत मी जिवंत असणार आहे.” (१३६).
मला खात्री आहे की हे जितके बोनहोफरसाठी खरे होते, तितकेच हे आज जोनीसाठी सुद्धा खरे आहे. मला स्वत:विषयी देखील तोच विश्वास आहे. “जॉन, तू कशासाठी जगत आहेस? सुवार्तेला प्रकट करत जाणाऱ्या, सतत प्रगती करत राहणाऱ्या महान कार्यात योगदान देण्यासाठी तुझ्याकडे फक्त इतकाच वेळ आहे. त्यामुळे ह्या संधीचा पुरेपूर फायदा घे!” ह्या 47 वर्षांपूर्वी पहिल्यांदा वाचलेल्या विश्वासाच्या विधानामुळे मी इतका थक्क झालो होतो की, हे शब्द मला आजही प्रेरणा आणि पाठबळ देतात.
वाईट दिवसांचा सुयोग्य उपयोग
बोनहोफरांना हिटलरची हत्या करण्याचा कट रचल्याबद्दल अटक करण्यात आली नव्हती. त्यावेळेस हा कट आणि ह्या कटात त्यांचा सहभाग आहे याविषयी कुठलीच माहिती मिळून आली नव्हती. जेव्हा हा कट हाणून पाडण्यात आला तेव्हा याचा मुख्य सूत्रधार क्लॉस वॉन स्टॉफेनबर्ग यांना दुसऱ्या दिवशी फासावर लटकवण्यात आले. याबाबत आणखी नावे उघड होऊ नयेत म्हणून बाकीच्यांनीही आत्महत्या केल्या.
या वेळेपर्यंत, ते एक साधे-भोळे पाळक आहेत आणि ते त्यांच्या देशावर प्रेम करतात आणि सरकारला पाठिंबा देतात, असा बनाव करून बोनहोफरांची विरोधक म्हणून भूमिका लपवून ठेवण्यात आली होती. त्यांनी राजकीय बाबींबद्दल अज्ञानी असल्याचा बनाव केला आणि असा युक्तिवाद केला की आपल्याला अयोग्यरित्या अटक केली गेली आहे. त्यांचा असा समज होता की, हिटलरच्या हत्येनंतर त्यांची सुटका केली जाईल — म्हणजे कटामध्ये असलेल्या त्यांच्या भूमिकेची कधीही चौकशी केली जाणार नाही, ह्याविषयी काहीच शोध घेतला जाणार नाही. पण ज्या क्षणी त्यांनी ऐकले की हिटलर ह्या कटातून वाचला, त्यांना कळून चुकले की त्यांचा डावपेच उधळला गेला आहे आणि आता त्यांचा अंत जवळ आला आहे. मुख्य सुत्रधारांपैकी एकाच्या डायरीत त्यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे निदर्शनास आले होते. जशे रशियन सैन्य बर्लिनमध्ये आक्रमण करून घुसले, बोनहोफर यांना त्यांच्या भावाच्या शेजारी आणि इतर पाच सह-सुत्रधारांसह फाशी देण्यात आली.
ज्यावेळेस बोनहोफर , “जोपर्यंत माझ्याकडे काहीतरी महान काम करण्यासाठी आहे”असे जीवन जगण्याविषयी बोलायचे, तेव्हां ह्या सर्व घटनाक्रमावरून असे दिसते की ते इफिस. ५:१५-१६ वर चिंतन करीत होते : “म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” ते दिवस वाईट होते, हे ते स्पष्टपणे जाणून होते. तुरुंगात राहण्याच्या वेळेत त्यांनी ज्या संधीला पाहिले ती म्हणजे ते लिहित असलेले एथिक्स ह्या त्यांच्या पुस्तकाचे लेखन पूर्ण करणे.
सत्कृत्ये जी तुमच्यासाठी राखून ठेवलेली आहेत
बोनहोफरांच्या ह्या विश्वास कथनाचा माझ्यावर इतका प्रभाव का पडला? किमान दोन मोठ्या कारणांमुळे. प्रथम, बोनहोफरांची ही घोषणा हे दाखवून देते की, इफि. 2:10 वर विश्वास ठेवणे आणि त्यानुसार जीवन जगणे हे कसे असते, की आपण सर्व, “ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.”
आपल्या प्रत्येकाकडे करण्यासाठी काहीतरी सत्कृत्ये आहेत जी देवाने आपल्यासाठी राखून ठेवली आहेत, जी आपल्याला त्याच्या महान कार्यात योगदान देण्यास आणि त्यांना पुढे घेऊन जाण्यास अनुमत करतात. त्याची योजना सृष्टीच्या आरंभापासून ते शेवटापर्यंत उलगडत जात आहे. बोनहोफर, जोनी, तुम्ही आणि मी — आपल्या सर्वांना त्याच्या वैश्विक आणि अविनाशी अशा कार्यात योगदान करावयास मिळते.
बोनहोफरांनी एथिक्स ह्या विषयावर लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकाकडे एक असे पुस्तक म्हणून पहिले जे लिहिण्यासाठी देवाने त्यांना अनेक अनुभवातून आणि अनेक वर्षांच्या बायबल मननातून घेऊन जाऊन तयार केले होते. त्यांच्या सभोवताल दुष्टता आणि मृत्यूचा अंधकार असतांनाही, आणि तुरुंगाच्या एका खोलीत बंदिस्त असतांनाही, पुस्तक लिहिण्याचे हे एकच काम त्यांना पार पडायचे आहे आणि ह्यालाच पूर्ण करण्यासाठी त्यांना राखून ठेवले गेले आहे, असे त्यांना वाटायचे. आणि त्या काळाची वाईट परिस्थिती लक्षात घेता, त्यांना वाटायचे की जो पर्यंत त्यांच्यासाठी शक्य होईल, तोपर्यंत त्यांच्याकडे असणाऱ्या शक्य तितक्या संधींचा जास्तीत जास्त वापर तत्परतेने केला गेला पाहिजे – असेच आपल्या सर्वांना देखील वाटले पाहिजे.
जगणे हे ख्रिस्त
के सत्कृत्य त्यांच्याकडून देवाला पूर्ण करवून घ्यावयाचे आहे, असे जे बोनहोफरला वाटत होते, ते सत्कृत्य पूर्ण करण्याआधीच त्यांना फासावर देण्यात आले. जोनीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, ज्या काळात तिला क्रियाशील व्यावहारिक सेवेची सत्कृत्ये करणे शक्य आहे, त्या काळाला ती जगून वयस्कर झाली आहे. जे मला माझ्या दुसऱ्या कारणाकडे या विशिष्ट वाक्यावर प्रेम करण्याच्या द्वारे घेऊन जाते. ख्रिस्तासाठी – उघडपणे, दररोज, कायमस्वरूपी – स्वतः जगणे म्हणजे, काहीतरी महान कार्य करणे आणि त्यासाठीच जगणे होय. ज्याप्रकारे बायबल सांगते, “जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे.” (फिली. १:२१).
असे जीवन जगण्यासाठी बोनहोफर बऱ्याच काळापर्यंत जिवंत राहिले. जोनीकडे देखील काहीतरी महान असं काम करण्यासारखे आहे, अगदी 100 व्या वर्षी सुद्धा: आपल्याला हे दाखवून देण्यासाठी, की जरी आपण शरीरानुसार अत्यंत अशक्त होत जातो आणि ह्या जगामुळे खूप थकूत जातो, ख्रिस्तासाठी जीवन जगणे म्हणजे काय आहे.
प्रामाणिकपणे सांगायचे ठरले तर, मी बोनहोफर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा फार मोठा चाहता नाही. मला त्यांचे अपूर्ण राहिलेले एथिक्स हे पुस्तक वाचण्यास कठीण वाटले. त्याचबरोबर मी त्यांनी लिहिलेले द कॉस्ट ऑफ डिसायपलशीप हे पुस्तक देखील वाचले, आणि ज्यावेळेस मला ह्याचे कौतुक करावेसे वाटते, हे पुस्तक जर आज एका उल्लेखनीय गुणवत्तेशिवाय छापले गेले तर मला याचे नवल वाटेल की: बोनहोफर हे स्वतः ख्रिस्तासाठी खरोखर — उघडपणे, दररोज, कायमचेच — जगले आणि आम्हाला त्यांच्या जीवनाच्या आणि मृत्यूच्या द्वारे, “शिष्यत्वाची किंमत” दाखवून दिली.
एका पुस्तकाच्या मागे असणारा माणूस हा तोच व्यक्ती असतो जो त्या पुस्तकाला वाचन करण्यास योग्य बनवतो. अशा प्रकारचे वाईट दिवस आणि परिस्थिती असतांना ख्रिस्तासाठी जगणे आणि मरणे, विशेषकरून नाझीवादाचा समूळ नाश केला जात असतांना – हेच ते महान कार्य करण्यासाठी जीवन जगणे होते.
काठीच्या आधारे धावणे
जोनी अजूनही जिवंत आहे कारण 100 व्या वर्षी ख्रिस्तासाठी जगणे ही स्वतःच देवाचे गौरव करणारी आणि त्याच्या राज्याची वाढ करणारी एक मोठी गोष्ट आहे. ख्रिस्ताप्रीत्यर्थ तिचे तिच्या खोलीत दिवसागणिक रहाणे, प्रार्थना करणे आणि तिचे बायबल वाचणे, आणि इतरांवर ह्याचा प्रभाव काय पडेल, ह्या सर्व गोष्टी आता तिला कळत नाहीत. ती माझ्यावर आरोप करेल की मी विनाकारण तिच्याविषयी खूप कौतुकास्पद बोलत आहे.
परंतु मी म्हणतो की, शंभराव्या वर्षी दानिएलाच्या पुस्तकाचा अभ्यास पूर्ण करणे, हे देवाच्या राज्याचा शोध घेणे आणि ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहणे म्हणजे काय, ह्याचे एक आकर्षक चित्र आहे.
जरी ह्या दिवसांत तिला प्रवास करता येत नसला तरी तिची साक्ष प्रवास करू शकते. मी तिच्याविषयीच्या जीवन-कथा चीन, युगांडा, क्युबा आणि इतरत्र ठिकाणी सांगितल्या आहेत. तिला चालण्यासाठी वॉकरची (काठीची) गरज आहे. पण तिची जीवन-कथा अजूनही धावू शकते. मला कधी कधी असे वाटते की, ती पुढच्या पिढीला ख्रिस्ताप्रीत्यर्थ जगण्यासाठी आकर्षित करता येईल तोपर्यंत ती जगत आहे. हेच ते महान काम आहे जे करण्यासाठी काहीतरी केले गेले पाहिजे.
लेखक
जॉन एन्सर (अतिथी लेखक)