
“तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” (मत्तय 27:65).
जेव्हां येशू मेला आणि त्याला पुरण्यात आले, व त्याच्या कबरेवर मोठी धोंड ठेवण्यात आली, तेव्हां परूशी लोक पिलाताजवळ येऊन ती धोंड मोहरबंद करण्याची व कबरेवर पहारा देण्याची परवानगी मागू लागले.
त्यांनी आटोकाट प्रयत्न केला – पण व्यर्थच.
त्या वेळी ते आशारहित होते, आजही ते आशारहित आहे, आणि ते नेहमीच आशारहित असेल. त्यांनी कितीही प्रयत्न केला असला तरीही, लोक येशूला दाबून ठेवू शकत नाहींत. ते त्याला पुरलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाहींत.
हे समजणे कठीण नाहीं: तो मार्ग फोडून बाहेर येऊ शकतो कारण त्याला बळजबरीने आत टाकण्यात आले नाहीं. त्यानें स्वतःची निंदा होऊ दिली आणि छळ होऊ दिला आणि बहिष्कृत होऊ दिलें आणि तिरस्कार होऊ दिला आणि ठार करू दिलें.
”मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाहीं, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे” (योहान 10:17-18).
कोणी त्याला दाबून ठेवू शकत नाहीं कारण कोणीही त्याला खाली पाडलेले नाहीं. जेव्हां तो तयार होता तेव्हां त्यानें स्वतःला दिलें.
जेव्हां असे दिसते कीं तो पुरला गेला ते चांगल्यासाठींच, तेव्हां येशू अंधारात काहींतरी अद्भुत करीत आहे. “परमेश्वराचे राज्य असे आहे कीं, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो, आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाहीं.” (मार्क 4:26-27).
जगास वाटते कीं येशूचा अंत झाला – तो मार्गातून दूर झाला – पण येशू अंधारलेल्या जागी कार्य करीत आहे. ”गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाहीं तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.” (योहान 12:24). त्यानें स्वतःला पुरले जाऊ दिलें – “कोणीही (माझा प्राण) माझ्यापासून घेत नाहीं” – आणि जेव्हां आणि जेथे त्याला वाटेल तेव्हां तो सामर्थ्यानिशी बाहेर येईल – “तो परत घेण्याचाही अधिकार आहे.”
”त्याला देवानें मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.“ (प्रेषितांची कृत्ये 2:24). ”अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने“ येशूचे याजकपद अद्याप आहे (इब्री 7:16).
मागील वीस शतके, जगाने खूप प्रयत्न केला आहे – पण व्यर्थ. ते त्याला पुरू शकत नाहींत. ते त्याला आत धरून ठेवू शकत नाहींत. ते त्याला शांत करू शकत नाहींत किंवा मर्यादित करू शकत नाहींत. येशू जिवंत आहे आणि जेथे कोठे तो जाऊ इच्छितो तेथे जाण्यास व येण्यास तो पूर्णपणे स्वतंत्र आहे.
त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यासोबत जा, मग काहींही का असेना. तुम्हीं शेवटी पराभूत होऊं शकत नाहीं.