12 July : विश्वास आमचे दोष, लोभ, आणि भिती दूर घालवितो

Alethia4India
Alethia4India
12 July : विश्वास आमचे दोष, लोभ, आणि भिती दूर घालवितो
Loading
/

ताकींद देण्याचा हेतू हा आहे कीं, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीति व्यक्त व्हावी. (1 तीमथ्य 1:5)

येथें पौलाचा मुख्य हेतू प्रीतिवर जोर देणें आहे. आणि या थोर गाभाऱ्यातून स्वाभाविकपणें उद्भवणाऱ्या गोष्टींपैकीं एक आहे निष्कपट विश्वास. नक्कीच प्रीति ही विश्वासातून उद्भवते याचे कारण हे आहे कीं देवाच्या कृपेवरील विश्वास प्रीतिस अडखळण आणणाऱ्या पापी शक्तींस आमच्या अंतःकरणातून दूर करतो.

जर आम्हांला दोषी असल्यासारखे वाटत असेल, तर आमचा कल आत्मकेंद्रित नैराश्य आणि स्वतःवर कींव वाटणाऱ्या भावनेंत लोळत पडून राहण्याकडें असतो, इतरांच्या गरजांकडें पाहणें किंवा त्यांची काळजी करणें तर दूर राहिले. किंवा आपण आपला दोष लपविण्यासाठीं ढोंग करीत बसतो, आणि म्हणून नात्यांमधील सर्व खरेपणा नष्ट करून बसतो, ज्यामुळें खरे प्रेम अशक्य होते. किंवा आपण आपला स्वतःचा दोष कमी दाखविण्यासाठीं इतर लोकांच्या चुकांबद्दल बोलतो, म्हणजें असे काहीं जी प्रीति कधी करीत नाहीं. म्हणून, जर आम्हीं प्रीति करणार असू, तर आम्हांला दोषाच्या विनाशकारक प्रभावांवर मात करावी लागेल.

भितीचेही असेच आहे. जर आम्हांला भिती वाटत असेल, तर मंडळीत आलेंल्या अनोळखी व्यक्तीजवळ आम्हीं जाणार नाहीं ज्याला कदाचित स्वागत आणि प्रोत्साहनाच्या शब्दाची गरज असू शकते. किंवा पाचारण म्हणून आम्हीं सरहद्दीवरील मिशनचा नाकार करू शकतो, ते फार जोखिमेचे काम वाटते. किंवा आपण अतिरिक्त विम्यासाठीं पैसे वाया घालवत असू, आणि सर्व प्रकारच्या लहान-सहान भयगंडाने घाबरत असू, इतके कीं आम्हीं स्वतःमध्यें गुरफटलेले राहतो आणि इतरांच्या गरजा आम्हांला दिसू शकत नाहींत. या सर्व गोष्टी प्रीतिच्या विपरीत आहेत.

लोभाच्या बाबतीतही हेच खरे आहे. जर आम्हीं लोभी असू, तर आम्हीं चैनविलासावर पैसे खर्च करीत राहणार – तो पैसा जो सुवार्ता प्रसारासाठीं गेला पाहिजे. आम्हीं कुठलाही धोका पत्करत नाहीं, आमची मूल्यवान संपत्ति आणि आर्थिक भविष्य धोक्यात येईल अशी भिती आम्हांला वाटते. आम्हीं लोकांऐवजी ऐहिक वस्तूंवर लक्ष केंद्रिंत करतो, आणि लोकांकडें आमच्या भौतिक लाभासाठीं संसाधने म्हणून पाहतो. यामुळें प्रीतिचा नाश होतो.

पण भविष्यातील कृपेवरील विश्वास दोष आणि भिती आणि लोभ यांस अंतःकरणातून दूर सारून प्रीति उत्पन्न करतो.

विश्वास दोष दूर करतो कारण तो त्या आशेस दृढ धरून ठेवतो कीं ख्रिस्ताचा मृत्यू आता आणि सर्वकाळासाठीं निर्दोषमुक्तता आणि नीतिमत्व प्राप्त करण्यासाठीं पुरेसा आहे (इब्री 10:14).

विश्वास भय घालवून टाकतो कारण तो या अभिवचनावर अवलंबून राहतो, “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे,………..मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो” (यशया 41:10).

आणि विश्वास लोभ दूर घालवून टाकतो कारण त्याला ही खात्री असते कीं ख्रिस्त हा त्या सर्व संपत्तीपेक्षा जी हे संपूर्ण जग देऊ करते, मोठा आहे (मत्तय 13:44).

म्हणून जेव्हा पौल म्हणतो, “ताकींद देण्याचा हेतू हा आहे कीं… निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीति व्यक्त व्हावी”, तेव्हा तो प्रीतिस अडखळण आणणाऱ्या सर्व अडखळणांवर मात करणाऱ्या विश्वासाच्या प्रचंड सामर्थ्याविषयी बोलत आहे. जेव्हा आम्हीं विश्वासाचे युद्ध करतो – दोष आणि भिती आणि लोभास मारणाऱ्या देवाच्या अभिवचनांवर विश्वास करण्यासाठींचा लढा – तेव्हा आपण प्रीतिसाठीं लढा देत असतो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *